गेल्या महिन्यात इराण आणि इस्राइल यांच्यात झालेल्या संघर्षावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्राइलला मदत करत इराणच्या अणुकेंद्रांवर लढाऊ विमानांद्वारे हल्ले केले होते. अमेरिकेच्या या हल्ल्यात इराणच्या अणुकार्यक्रमाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. तेव्हापासून इराण आणि ट्रम्प यांच्यातील शत्रूत्व वाढलं असून, डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करण्यासाठी इराणमधील नेते, लष्करी अधिकारी आणि मौलवींकडून कटकारस्थान रचण्यात येत आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी मौलवींच्या इशाऱ्यावर क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून मोठा निधी उभारण्याची तयारी सुरू आहे. तसेच आतापर्यंत या माध्यमातून ४० मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच ३५० कोटी भारतीय रुपये एवढी प्रचंड रक्कम जमवण्यात आली आहे. एवढंच नाही तर इराणचा शेजारील देश असलेल्या अझरबैजाननेही डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणाऱ्याला बक्षीस जाहीर केलं आहे.
इराण आणि इस्राइलमध्ये युद्धविराम जाहीर झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याचं श्रेय घेतलं होतं. मात्र इस्राइल आणि इराणमध्ये पेटलेल्या संघर्षासाठी अनेक इराणी लोक हे डोनाल्ड ट्रम्प यांनाच जबाबदार धरत आहेत. त्यामुळेच इराणमधील मौलवींच्या इशाऱ्यावर डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी निधी गोळा गेला जात आहे.
समोर आलेल्या गोपनीय माहितीनुसार या निधीसाठी कुणीही आणि कितीही रकमेचं योगदान देऊ शकतं. अनेक इराणी मौलवींनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी काढलेल्या फतव्यानंतर ब्लड कोवोनेंट नावाच्या एका कथित समुहाने ट्रम्प यांची हत्या करण्यासाठी हा निधी जमा करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, अजरबैजानमधूनही इराणमधील मौलवींच्या या मोहिमेला पाठिंबा देण्यात आला असून, तिथूनही ट्रम्प यांची हत्या करणाऱ्याला बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.