बदलत्या लाईफस्टाईलसोबतच जोडीदार शोधण्याच्या पद्धतीमध्येही बदल झाला आहे. काही जण कॉलेजमध्ये आपला जोडीदार मिळवतो. तर कुणी ऑफिसमधील सहकाऱ्यामध्येच आपला लाईफ पार्टनर शोधतो. मात्र काहीजणांना खूप प्रयत्न करूनही जोडीदार मिळत नाही. दरम्यान, सध्या व्हायरल असलेल्या एका व्हिडीओमध्ये एक तरुणी न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअर येथे उभी राहून भारतीय नवराच हवा असा फलक झळकावताना दिसत आहे. या तरुणीने हातात घेतलेला फलक आणि या तरुणीकडे पाहून लोक अवाक् झालेले दिसत आहेत. तसेच येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या नजराही ही तरुणी आणि तिच्या हातातील फलकाकडे वळत आहेत.
दरम्यान, लोक या तरुणीच्या अजब अटीबाबत उत्सुकतेने विचार करत असतानाच स्पायडरमॅनचा ड्रेस घातलेली एक व्यक्ती तिच्या दिशेने येते. तसेच सर्वांचं लक्ष वेधून घेते. हे दृश्य एवढं गमतीदार होतं की लोकांनी आपल्याकडील कॅमेऱ्यामध्ये ते चित्रित केलं. आता सदर व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्यापासून चर्चांना उधाण आलं आहे. तसेच ही तरुणी नेमकी होती कोण? असा प्रश्न व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येकाला पडला आहे. मात्र सदर तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही.