अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांच्या अलास्का येथील भेटीच्या काही तास आधीच रशियाला झटका बसला आहे. पुतिन-ट्रम्प यांच्या १५ ऑगस्टच्या भेटीपूर्वी युक्रेनच्या नौदलाने मोठा दावा केला आहे. रशियाचे अत्याधुनिक Su-30SM लढाऊ विमान काळ्या समुद्राजवळ गायब झाले आहे. या विमानाची किंमत जवळपास ५० मिलियन डॉलर म्हणजे ४१५ कोटी इतकी असल्याचे सांगितले जाते.
इतकेच नाही तर रशियाच्या रियाजान परिसरात दारू गोळाच्या फॅक्टरीतही जोरदार स्फोट झाला. हा युक्रेनच्या आक्रमक रणनीतीचा एक भाग मानला जात आहे. मात्र पुतिन यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. युक्रेनी नौदलानुसार, १४ ऑगस्टला स्नेक आयलँडच्या दक्षिण पूर्वेकडील एका मिशनमध्ये रशियाचे Su-30SM हे फायटर जेट क्रॅश झाले आहे. २ इंजिन असणारे हे विमान आहे. त्यात २ सीटचे मल्टीरोल फाइटर आहे. ज्यातून हवेतून शत्रूला मात देण्यासोबतच जमिनीवरील हल्ल्यासाठीही याचा वापर केला जाऊ शकतो.
रशियाचा या जेटशी संपर्क तुटलेला आहे. त्यानंतर रशियन नौदलाने पायलटचा शोध घेण्यासाठी सर्च अँन्ड रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले आहे. समुद्राच्या पृष्ठभागावर विमानाचा मलबा दिसला पण अद्याप दोन्ही वैमानिकांचा कोणताही पत्ता लागलेला नाही असा दावा युक्रेनी गुप्तचर यंत्रणेकडून रशियाच्या रेडिओ इंटरसेप्ट केल्यानंतर केला आहे. ही पहिलीच वेळ नाही जेव्हा रशियाने त्यांचे SU 30 विमान गमावले आहे. २ मे रोजी युक्रेनने नोवोरोस्सियस्कजवळ समुद्री ड्रोनने २ Su 30 जेट पाडल्याचा दावा केला होता. ९ मे रोजी किंजल मिसाइल लॉन्च करणाऱ्या एअरबेसवरील हल्ल्यात आणखी एक Su 30 विमानाचे नुकसान झाले.
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी वाढला तणाव
१५ ऑगस्टला पुतिन आणि ट्रम्प यांची भेट होत आहे. रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध संपवण्याचा हा एक प्रयत्न आहे. या चर्चेत युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनीही सहभाग घ्यावा असं अमेरिकेला वाटत होते. परंतु पुतिन यांनी यावर आक्षेप घेतला. तब्बल ७ वर्षांनी हे दोन्ही नेते भेटत आहेत. रशियाने युक्रेनवर हवाई हल्ले वाढवले. यामुळे संतप्त झालेल्या ट्रम्पने रशियाला शांतता करारावर चर्चा करण्यासाठी ५० दिवसांची मुदत दिली. जर तात्काळ युद्धबंदीवर सहमती झाली नाही तर अमेरिकेने अधिक कठोर निर्बंध लादण्याचा इशारा ट्रम्पने दिला होता. ही अंतिम मुदत ८ ऑगस्ट रोजी संपली. अंतिम मुदतीच्या दोन दिवस आधी ६ ऑगस्ट रोजी अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची भेट घेतली होती. या बैठकीनंतरच ट्रम्प आणि पुतिन यांच्यात बैठकीचे नियोजन करण्यात आले. ट्रम्प यांनी ८ ऑगस्ट रोजी बैठकीची घोषणा केली. आजच्या बैठकीनंतर लगेच युद्धबंदी अपेक्षित नाही. युक्रेन युद्ध संपवण्याचे मार्ग काय असू शकतात हे समजून घेणे हा या बैठकीचा उद्देश असल्याचे सांगत व्हाईट हाऊसने तात्काळ युद्धबंदीची शक्यताही फेटाळून लावली.