वास्को-द-गामाच्या भारत प्रवेशाला ५१८ वर्ष पूर्ण
By Admin | Updated: May 20, 2016 13:17 IST2016-05-20T12:46:50+5:302016-05-20T13:17:06+5:30
युरोपातून थेट भारत भूमीवर दाखल झालेले वास्को द गामा पहिले युरोपियन प्रवासी आहेत. आजच्याच दिवशी २० मे १४९८ रोजी वास्को द गामा भारतात दाखल झाले होते.

वास्को-द-गामाच्या भारत प्रवेशाला ५१८ वर्ष पूर्ण
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - युरोपातून थेट भारत भूमीवर दाखल झालेले वास्को द गामा पहिले युरोपियन प्रवासी आहेत. आजच्याच दिवशी २० मे १४९८ रोजी वास्को द गामा भारतात दाखल झाले होते. त्यांच्या भारतात दाखल होण्याला आज ५१८ वर्ष पूर्ण झाली आहेत. अटलांटिक महासागरातून प्रवास करत आलेले त्यांचे जहाज सर्वप्रथम केरळच्या कालिकत बंदरात थांबले. त्यांच्या आगमनानंतर युरोप आणि भारतामध्ये व्यापारी संबंधांची सुरुवात झाली.
वास्को-द-गामा मूळचे पोर्तुगीज होते. जुलै १४९७ रोजी पोर्तुगालच्या लिसबनमधून त्यांनी प्रवासाला सुरुवात केली होती. आफ्रिकेच्या पूर्वेला मालिंदीमध्ये त्यांची भारतीय व्यापा-याच्या मदतनीसाबरोबर ओळख झाली. त्यानंतर त्यांनी हिंद महासागरातून प्रवासाला सुरुवात केली.
कालिकत बंदरात उतरल्यानंतर तिथल्या मुस्लिम व्यापा-यांकडून वास्को-द-गामाला फारशी चांगली वागणूक मिळाली नाही. १४९९ मध्ये पुन्हा पोर्तुगालला परतताना त्यांची मुस्लिम व्यापा-यांबरोबर लढाईही झाली होती.
१५०२ साली झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी वास्को-द-गामा जहाजांचा ताफा घेऊन पुन्हा कालिकत बंदरात दाखल झाले. १५२४ साली पोर्तुगालने त्यांना व्हॉईस रॉय बनवून भारतात पाठवले. भारतातच ते आजारी पडले आणि कोचिनमध्ये त्यांचा मृत्यू झाला.