वाजपेयींना बांगलामुक्ती पुरस्कार

By Admin | Updated: June 8, 2015 03:06 IST2015-06-08T03:06:30+5:302015-06-08T03:06:30+5:30

बांगलादेशातर्फे तेथील सर्वोच्च प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन रविवारी भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना गौरविण्यात आले.

Vajpayee's Bangla Mukti Award | वाजपेयींना बांगलामुक्ती पुरस्कार

वाजपेयींना बांगलामुक्ती पुरस्कार

सर्वोच्च बहुमान : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला अभिमानाने स्वीकार

ढाका : बांगलादेशातर्फे तेथील सर्वोच्च प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन रविवारी भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना गौरविण्यात आले. वाजपेयी यांच्यावतीने विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा बांगलादेश मुक्ती पुरस्कार स्वीकारला .
राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या ‘वंगभवन’मध्ये झालेल्या झगमगत्या समारंभात बांगलादेशाचे अध्यक्ष अब्दुल हमीद यांनी हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपुर्द केला. पंतप्रधान शेख हसीना व इतर वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते. वाजपेयी यांच्यासारख्या महान नेत्याला हा सन्मान मिळण्याचा दिवस म्हणून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल, असे याप्रसंगी बोलताना मोदी म्हणाले.
वाजपेयी यांनी आपले संपूर्ण आयुष्य सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी लढण्यात घालवले. माझ्यासारख्या लोकांसाठी ते प्रेरणास्थान ठरले, असे वाजपेयी यांच्यावतीने हा
पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले. शेख हसीना यांनी या वेळी बोलताना मोदी हे वाजपेयी यांचे सक्षम वारस असल्याचे म्हटले. (वृत्तसंस्था)

मोदींच्या आईसाठी खास साडी
बांगलादेशाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईसाठी बांगलादेशाच्या पंतप्रधान जामदानी साडी ही तेथील मौल्यवान साडी भेट म्हणून देणार आहेत. जामदानी साडी ही अत्यंत मौल्यवान साडी असून बांगलादेशात ती हाताने विणली जाते. ही खास साडी तयार करण्यास दोन वर्षांचा कालावधी लागतो. ही साडी अंगठीतून आरपार जाते, असे मानले जाते.

भारत व बांगलादेशाातील मैत्रीचे बंध कोणत्यही दबावाखाली तुटू नयेत, असे ६ डिसेंबर १९७१ रोजी संसदेत बोलताना वाजपेयी यांनी म्हटले होते. १९७१ साली वाजपेयी यांनी बांगलादेश मुक्तीसाठी सत्याग्रहाचे आवाहन केले होते. त्याला युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता, अशी आठवण मोदी यांनी सांगितली.

Web Title: Vajpayee's Bangla Mukti Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.