अमेरिका-रशिया दुरावा खूपच वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2017 01:02 IST2017-04-14T01:02:11+5:302017-04-14T01:02:11+5:30
अमेरिका आणि रशिया यांच्या संबंधात पूर्वी कधी नव्हता एवढा दुरावा निर्माण झाला आहे, असे मत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले.

अमेरिका-रशिया दुरावा खूपच वाढला
वॉशिंग्टन : अमेरिका आणि रशिया यांच्या संबंधात पूर्वी कधी नव्हता एवढा दुरावा निर्माण झाला आहे, असे मत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले. तथापि, हे दोन देश एकत्र आले तर सकारात्मक बदल होतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
‘नाटो’चे महासचिव जनरल जेन्स स्टोल्टनबर्ग यांच्यासोबत व्हाइट हाऊसमध्ये एका संयुक्त पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, ‘नाटो’ आणि आमचा देश रशियाशी सकारात्मक संबंध ठेवू शकले तर? सध्या रशियाशी आमचे संबंध फार चांगले नाहीत. पूर्वी कधीही नव्हता एवढा दुरावा आमच्या संबंधात निर्माण झाला आहे; पण आम्ही पाहात आहोत काय होऊ शकते.
पुतीन रशियाचे नेते आहेत. रशिया एक मजबूत देश आहे. आम्हीही एका मजबूत स्थितीत आहोत. बघूया हे कसे साध्य होते. विदेशमंत्री रेक्स टिलरसन यांनी आपला रशिया दौरा पूर्ण केला आहे. त्यांनी रशियाचे अध्यक्ष ब्लादमिर पुतीन यांच्याशी चर्चा केली. युरोपीय देशांनी रशियाची भीती बाळगण्याची गरज नाही, असेही ट्रम्प म्हणाले. आपल्या पूर्वीच्या वक्तव्यावरून यू टर्न घेत डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, नॉर्थ अटलांटिक ट्रिएटी आॅरगनायजेशन (नाटो) आता कालबाह्य नाही. ‘नाटो’चे महासचिव जेन्स स्टोल्टनबर्ग यांच्यासोबत व्हाइट हाउसमध्ये एका पत्रकारपरिषदेत बोलताना ट्रम्प म्हणाले की, मी यापूर्वी ‘नाटो’बद्दल आक्षेप नोंदविला होता; पण आता त्यांनी भूमिकेत बदल केले असून ते दहशतवादाविरुद्ध लढत आहेत.
इसिसविरुद्धच्या लढाईत ‘नाटो’ सहकार्याची भूमिका घेईल
- ‘नाटो’ कालबाह्य असल्याचे मी म्हटले होतो. आता ते कालबाह्य नाहीत. इसिसविरुद्धच्या लढाईत ‘नाटो’ सहकार्याची भूमिका घेईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
- ‘नाटो’ची स्थापना १९४९ मध्ये झाली. त्यांच्या सदस्यांची संख्या १२ वरून २८ झाली आहे. सोमवारी यात मोंटेनेग्रो या २९व्या देशाची भर पडली आहे.