US Election: अमेरिकेत महासत्तांतर! जाे बायडेन नवे अध्यक्ष; डोनाल्ड ट्रम्प यांना मतदारांचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2020 07:17 AM2020-11-08T07:17:51+5:302020-11-08T07:42:23+5:30

कोरोनाकहराने टोक गाठलेेले असताना झालेली अध्यक्षीय निवडणूक चुरशीची झाली.

US Election: Superpower in America! Jay Biden new president; Voter shock to Donald Trump | US Election: अमेरिकेत महासत्तांतर! जाे बायडेन नवे अध्यक्ष; डोनाल्ड ट्रम्प यांना मतदारांचा झटका

US Election: अमेरिकेत महासत्तांतर! जाे बायडेन नवे अध्यक्ष; डोनाल्ड ट्रम्प यांना मतदारांचा झटका

Next

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदी कोण, याचे उत्तर अखेरीस शनिवारी स्पष्ट झाले. पेनसिल्व्हेनिया राज्यातील निर्णायक मते मिळवत जो बायडेन यांनी अध्यक्षपदासाठी आवश्यक असलेला २७० हा बहुमताचा आकडा गाठला. त्यांच्या खात्यात आता २८४ प्रातिनिधिक मते (इलेक्टोरल व्होट्स) आहेत. तर ट्रम्प यांना २१४ मते मिळाली आहेत. अजूनही काही राज्यांमध्ये मतमोजणी सुरू असली तरी बायडेन हेच अमेरिकेच्या अध्यक्षपदी असतील, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. येत्या २० जानेवारी रोजी बायडेन अध्यक्षपदाची शपथ घेतील. तर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष म्हणून शपथ ग्रहण करतील.

कोरोनाकहराने टोक गाठलेेले असताना झालेली अध्यक्षीय निवडणूक चुरशीची झाली. सुरुवातीला आघाडी घेणारे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नंतर अनेक राज्यांमधून पिछाडीवर पडू लागले.  त्यामुळे सर्वांचे लक्ष जॉर्जिया, पेनसिल्व्हेनिया, नेवाडा, अरिझोना आणि नॉर्थ कॅरोलायना या राज्यांमधील मतमोजणीकडे लागले होते. यापैकी नॉर्थ कॅरोलायना राज्यातच ट्रम्प यांना आघाडी मिळाली होती.

उर्वरित सर्व राज्यांत बायडेन आघाडीवर होते. शनिवारी २० प्रातिनिधिक मते असलेल्या पेनसिल्व्हेनिया राज्यांत बायडेन यांनी विजय मिळवत आपली प्रातिनिधिक मतांची संख्या २८४ पर्यंत वाढवली आणि तिथेच ट्रम्प यांचा पराभव निश्चित झाला. दरम्यान, पराभव निश्चित होत असताना, मी ही निवडणूक जिंकलो असल्याचे ट्विट ट्रम्प यांनी करीत रडीचा डाव सुरूच ठेवला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो बायडेन आणि कमला हॅरिस यांचे  ट्विटरद्वारे अभिनंदन  केले आहे.

धन्यवाद अमेरिका. आपल्या महान देशाचे नेतृत्व करण्याची संधी तुम्ही मला दिली. आपल्यापुढे अनेक आव्हाने आहेत. मात्र, तुमच्या साथीने मी ती सहज पार करेन. मी सर्व अमेरिकी नागरिकांचा अध्यक्ष असेन.- जाे बायडेन नवे अध्यक्ष 

तुम्ही माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवेन. ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची होती. अमेरिकेच्या अस्सल लोकशाहीचा आणि लोकांच्या इच्छाशक्तीचा आज विजय झाला आहे. आता खूप कामे करायची आहेत.   - कमला हॅरिस, नवनिर्वाचित उपाध्यक्ष
 

Web Title: US Election: Superpower in America! Jay Biden new president; Voter shock to Donald Trump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.