अमेरिका-क्यूबातील ५० वर्षांचे वैर मिटले, हवानात जल्लोष
By Admin | Updated: December 19, 2014 04:22 IST2014-12-19T04:22:45+5:302014-12-19T04:22:45+5:30
पन्नास वर्षांची कटुता दूर करून अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि क्यूबाचे राष्ट्राध्यक्ष राउल कॅस्ट्रो यांनी दोन्ही देशांदरम्यान आर्थिक व राजनैतिक संबंध सुरू करण्याची घोषणा केली

अमेरिका-क्यूबातील ५० वर्षांचे वैर मिटले, हवानात जल्लोष
वॉशिंग्टन : पन्नास वर्षांची कटुता दूर करून अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि क्यूबाचे राष्ट्राध्यक्ष राउल कॅस्ट्रो यांनी दोन्ही देशांदरम्यान आर्थिक व राजनैतिक संबंध सुरू करण्याची घोषणा केली आहे. उभय देशांनी परस्परांच्या कैद्यांची सुटका करून याचा श्रीगणेशाही केला. जगातील अनेक राष्ट्रांनी या घडामोडीचे ऐतिहासिक अशा शब्दात स्वागत केले आहे.
अमेरिकी किनारपट्टीहून केवळ ९३ मैलावर असलेला क्यूबा १९६०च्या दशकापासूनच अमेरिकेच्या डोळ्यांत सलत होता. क्यूबात १९५९ मधील क्रांतीनंतर फिडेल कॅस्ट्रो यांचे कम्युनिस्ट सरकार स्थापन झाले. त्यावरून अमेरिकेने क्यूबासोबतचे सर्व संबंध तोडून त्याच्यावर आर्थिक निर्बंध लादले होते.
तेव्हापासून आतापर्यंत अर्धे शतक लोटले असून आता राउल कॅस्ट्रो हे क्यूबाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. राउल हे फिडेल यांचे भाऊ आहेत. क्यूबा अनेक दशकांपासून आर्थिक तंगीत असून अमेरिकेसोबतच्या चांगल्या संबंधांमुळे लाभ होऊ शकतो, असे राउल कॅस्ट्रो यांना वाटते. ओबामा व कॅस्ट्रो यांच्यात चर्चा सुरू व्हावी म्हणून व्हॅटिकन व कॅनडा गेल्या १८ महिन्यांपासून प्रयत्न करत होते.
मंगळवारी राउल कॅस्ट्रो यांनी कैद्यांच्या देवाणघेवाणीस सहमती दर्शविली आणि उभय देशातील निम्म्या शतकापासूनची कोंडी फुटली. त्यानंतर क्यूबाने पाच वर्षे कैदेत राहिलेले अमेरिकी नागरिक अॅलन ग्रॉस यांंची सुटका केली.
या घडामोडीनंतर उभय देशांनी राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याची घोषणा केली. बंदी घालण्यात आलेले उपग्रह तंत्रज्ञान आयात केल्याच्या आरोपावरून ग्रॉसला क्यूबात अटक करण्यात आली होती.
ग्रॉसच्या सुटकेपाठोपाठ अमेरिकेने क्यूबन फाईव्ह म्हणून चर्चित क्यूबाच्या तीन कैद्यांची सुटका केली. या तिघांना हेरगिरीच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. अमेरिकेने क्यूबाला मानवाधिकाराचा सन्मान करण्याच्या दिशेने पावले उचलण्याचे आवाहन केले होते व इतर ५३ राजकीय कैद्यांच्या सुटकेला सहमती दर्शविल्याबद्दल क्यूबाच्या नेतृत्वाची प्रशंसा केली होती. दुसरीकडे कॅस्ट्रो यांनी क्यूबावरील अमेरिकी आर्थिक निर्बंध हटविण्याची मागणी केली आहे. (वृत्तसंस्था)