नरेंद्र मोदींना अमेरिकेतील न्यायालयाचे समन्स
By Admin | Updated: September 26, 2014 11:07 IST2014-09-26T10:27:07+5:302014-09-26T11:07:15+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बहुचर्चीत अमेरिका दौ-याला आज सुरुवात झाली असतानाच अमेरिकेतील एका न्यायालयाने मोदींना समन्स बजावले आहे.

नरेंद्र मोदींना अमेरिकेतील न्यायालयाचे समन्स
ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. २६ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुचर्चित अमेरिका दौ-याला आज सुरुवात झाली असतानाच अमेरिकेतील एका न्यायालयाने मोदींना गुजरात दंगलीसंदर्भात समन्स बजावले आहे. हा समन्स मिळाल्यावर मोदींना त्यावर २१ दिवसांमध्ये उत्तर देणे बंधनकारक असणार आहे.
अमेरिकन जस्टीस सेंटर या मानवी हक्कांसाठी लढणा-या समाजसेवी संस्थेने न्यूयॉर्कमधील फेडरल कोर्टात २००२ मधील गुजरात दंगलीसंदर्भात याचिका दाखल केली होती. गुजरातमधील दंगलीचे चटके बसलेल्या दंगलग्रस्तांच्या आधारे ही याचिका दाखल झाली होती. या याचिकेत गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींकडून स्पष्टीकरण मागितले आहे. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान फेडरल कोर्टाने मोदींना समन्स बजावले आहे. या याचिकेवर उत्तर न दिल्यास मोदींच्या विरोधातही निकाल दिला जाऊ शकते असे अमेरिकेतील कायदेतज्ज्ञांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून पाच दिवसांच्या अमेरिका दौ-यावर आहेत. मोदी अमेरिकेला पोहोचण्याच्या २४ तासांपूर्वीच फेडरल कोर्टाने मोदींना समन्स बजावले आहे.