अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना ताब्यात घेतल्यामुळे जागतिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. उत्तर कोरियाने मादुरो हे आपले 'मित्र' असल्याचं सांगत अमेरिकेला उघडपणे महायुद्धाचा इशारा दिला आहे. उत्तर कोरियाचे किम जोंग-उन यांनी अमेरिकेला कठोर शब्दांत इशारा दिला आहे.
ही कारवाई जगाला महायुद्धाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवू शकते असं म्हटलं आहे. तसेच किम जोंग-उन यांनी डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकन नेतृत्वाकडे मागणी केली आहे की, त्यांनी तातडीने निकोलस मादुरो यांची सद्यस्थिती जाहीर करावी. मादुरो हे आपले मित्र असल्याचं सांगत ते म्हणाले की, हे पाऊल जागतिक संघर्षाला जन्म देऊ शकतं. व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांची लगेचच सुटका करण्यात यावी, त्यांना तातडीने सोडा अन्यथा याचे गंभीर आंतरराष्ट्रीय परिणाम होतील.
रशियानेही अमेरिकेच्या या कारवाईचा कडक शब्दांत निषेध केला आहे. रशियन परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी करून म्हटलं आहे की, अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या विरोधात 'सशस्त्र आक्रमकता' दाखवली आहे, जी अत्यंत चिंताजनक आणि निंदनीय आहे. अमेरिकेने दिलेले तर्क निराधार असून हे पाऊल मुत्सद्देगिरीऐवजी वैचारिक शत्रुत्वाने प्रेरित आहे. मॉस्कोने सर्व बाजूंना तणाव वाढवणं टाळण्याचं आणि चर्चेद्वारे मार्ग काढण्याचे आवाहन केलं आहे.
"आमच्या कंपन्यांना बाहेर काढलं..."; व्हेनेझुएला एअर स्ट्राईकनंतर ट्रम्प यांचा जुना Video व्हायरल
अमेरिकेने व्हेनेझुएलाची राजधानी काराकाससह अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर भीषण एअर स्ट्राईक केला आहे. अमेरिकन हवाई दलाने काराकाससह मिरांडा, अरगुआ आणि ला गुइरा या शहरांवर जोरदार बॉम्ब हल्ले केले. या हल्ल्यानंतर व्हेनेझुएलामध्ये 'राष्ट्रीय आणीबाणी' घोषित करण्यात आली आहे. दरम्यान, व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अमेरिकेने आपल्या ताब्यात घेतलं असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिकेच्या या लष्करी कारवाईदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.