उरी हल्ल्यामागे भारतच, पाकिस्तानच्या उलट्या बोंबा
By Admin | Updated: September 28, 2016 13:45 IST2016-09-28T13:45:11+5:302016-09-28T13:45:11+5:30
पाकिस्तानला लक्ष्य करण्यासाठी उरी हल्ल्याची योजना भारतानेच आखली,असं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ बरळले आहेत.

उरी हल्ल्यामागे भारतच, पाकिस्तानच्या उलट्या बोंबा
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 28 - उरी हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशतवादी असल्याचे अनेक पुरावे सापडल्यानंतरही पाकिस्तानच्या उलट्या बोंबा सुरूच आहेत. पाकिस्तानला लक्ष्य करण्यासाठी उरी हल्ल्याची योजना भारतानेच आखली, असं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ बरळले आहेत. डॉन न्यूज या पाकिस्तानी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ख्वाजा आसिफ यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
काश्मीर प्रश्नावर भारत गंभीर भूमिका घेत नाही, असा आरोपही आसिफ यांनी केला आहे. भारताविरोधात अनेक पुरावे पाकिस्तानकडे आहेत, ज्यावरुन भारताची दुटप्पी भूमिका दिसून येते, अशी मुक्ताफळे आसिफ यांनी कार्यक्रमादरम्यान उधळली.सोमवारी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सभेत केलेल्या भाषणात उरी हल्ल्यावरुन पाकिस्तानचा स्पष्टपणे उल्लेख करत फटकारले होते. यानंतर चिडलेल्या पाकिस्ताननं भारतावर बिनबुडाचे आरोप करायला सुरुवात केली आहे. यापूर्वी आसिफ यांनी भारतावर आण्विक हल्ला करण्याची धमकी देखील दिली होती.
जागितक पातळीवर पाकिस्तानला एकटे पाडण्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. त्यावरही आसिफ यांनी टीका केली. भारताला पाकिस्तानवर आरोप लावून कोणत्याही देशाचं समर्थन मिळालेलं नाही. याऊलट पाकिस्तानला चीनने जाहीर पाठिंबा दिला आहे, असे आसिफ यांनी सांगितलं.