कलम ३७० संपुष्टात आणल्यास अशांतता
By Admin | Updated: November 17, 2014 02:40 IST2014-11-17T02:35:25+5:302014-11-17T02:40:01+5:30
नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते फारुक अब्दुल्ला यांच्या मते, ३७० कलम संपुष्टात आणल्यास मोठ्या पातळीवर अशांतता निर्माण होण्याचा धोका आहे.

कलम ३७० संपुष्टात आणल्यास अशांतता
लंडन : जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा समाप्त करण्याच्या भाजपाच्या ‘खतरनाक’ इराद्याबाबत चिंता व्यक्त करत राज्याचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले व नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते फारुक अब्दुल्ला यांच्या मते, ३७० कलम संपुष्टात आणल्यास मोठ्या पातळीवर अशांतता निर्माण होण्याचा धोका आहे. प्रकृतीच्या कारणास्तव अब्दुल्ला हे सध्या लंडनमध्ये आहेत.
गेल्या चार दशकांत प्रथमच सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला (७७ वर्षे) हे राज्य विधानसभा निवडणुकीच्या काळात आपल्या पक्षाचे नेतृत्व करणार नाहीत. गेल्या तीन महिन्यांपासून किडनीवरील उपचारार्थ ते लंडनमध्ये आहेत.
वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, ‘मी एक फलंदाज असून सध्या प्रकृती कारणास्तव येथे आहे. मात्र, मैदानात परतण्याची मोठी उत्सुकता आहे.’ येत्या फेब्रुवारीपर्यंत मायदेशी परतणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये विधानसभेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल.
अब्दुल्ला यांनी मुलाखतीत विविध मुद्यांना उत्तरे दिली. ते पुढे म्हणाले, ‘राज्यघटनेतील कलम ३७० समाप्त करण्याच्या भाजपाच्या इराद्याबद्दल मला मोठी चिंता वाटते. या कलमाने राज्याला विशेष दर्जा मिळाला आहे. या कलमासाठी महात्मा गांधी व भारत सरकारद्वारेही हमी देण्यात आली होती.’ भाजपा आपले लक्ष्य मिळविण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीरमध्येही त्यांच्याकडून देशातील अन्य भागांप्रमाणेच धु्रवीकरण केले जाईल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. कलम ३७० रद्द केल्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीकडे लक्ष वेधताना ते म्हणाले, राज्यातील तरुणांच्या मनात मोठी उलथापालथ होईल आणि आम्ही कधीच शांततेचे ध्येय गाठू शकणार नाही.