संयुक्त राष्ट्रांना दहशतवाद समजलेला नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी
By Admin | Updated: March 31, 2016 12:20 IST2016-03-31T08:28:41+5:302016-03-31T12:20:03+5:30
बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये बुधवारी भारतीय समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवादाच्या मुद्यावरुन संयुक्त राष्ट्रावर टिका केली.

संयुक्त राष्ट्रांना दहशतवाद समजलेला नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी
ऑनलाइन लोकमत
ब्रसेल्स, दि. ३१ - बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये बुधवारी भारतीय समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवादाच्या मुद्यावरुन संयुक्त राष्ट्रावर टीका केली. मागच्या आठवडयात ब्रसेल्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, संयुक्त राष्ट्राला अजूनही दहशतवादाची व्याख्या ठरवता आलेली नाही हे दुर्देव आहे.
दहशतवादामुळे आज संपूर्ण जगासाठी धोका निर्माण झाला आहे. दहशतवादाला आसारा आणि पाठिंबा देणा-यांवर कठोर कारवाईची गरज आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. दहशतवादाला धर्माशी जोडू नका, दहशतवाद संपूर्ण मानवजातीसाठी धोका असून, ज्यांचा मानवतेवर विश्वास आहे त्यांनी एकत्रितपणे याविरोधात लढा दिला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
जगाला आता दहशतवादाचे परिणाम दिसत आहेत. भारत मागच्या ४० वर्षांपासून दहशतवादाने त्रस्त आहे. ९/११ च्या घटनेने संपूर्ण जगाला दहशतवादाचा धक्का दिला, तो पर्यंत वर्ल्ड़ पॉवर्सना भारत काय सोसतोय त्याची कल्पना नव्हती. पण भारत दहशतवादासमोर झुकला नाही आणि झुकणारही नाही असे मोदींनी सांगितले.