Russia Attacks Ukraine's Navy ship: युक्रेनवरील हल्ले थांबवा असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणत असतानाच रशियाने पुन्हा प्रहार केला. रशियाने युक्रेनच्या नौदलाच्या मोठ्या युद्ध नौकेवरच हल्ला केला. पाण्यात हल्ला करण्यास सक्षम असलेल्या ड्रोनने हा हल्ला करण्यात आला. युद्ध नौका बुडाली असून, या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला, तर अनेक जण बेपत्ता झाले आहे. युक्रेन आणि रशिया दोन्ही देशांकडून या हल्ल्याला दुजोरा दिला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एक व्हिडीओ शुक्रवारी समोर आला. यात एक एका युद्ध नौकेवर हल्ला केला जात असताना दिसत आहे. एक ड्रोन पाण्यातून येत युद्ध नौकेला धडकते आणि त्यानंतर प्रचंड मोठा स्फोट होतो, असे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
युक्रेनच्या युद्ध नौकेवर रशियाचा हल्ला, व्हिडीओ पहा
युक्रेनमधील ओडेसा प्रांतात गुरूवारी (२८ ऑगस्ट) ही घटना घडली आहे. पाण्यातून ड्रोन हल्ला करण्यात आला. ज्यावेळी युद्ध नौकेवर हल्ला झाला, त्यावेळी ती युक्रेनमधील दानुबे नदी समुद्राला मिळते त्या ठिकाणी होते.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने युक्रेनच्या युद्ध नौकेवर हल्ला केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तर युक्रेनच्या नौदलाचे प्रवक्ते दिमीत्रो प्लेटेंचूक यांनी 'कीव इंडिपेडंट' वृत्तपत्राला बोलताना सांगितले की, हल्ल्यानंतर आता सगळ्यांचा आढावा घेतला जात आहे. युद्ध नौकेवरील बहुतांश जवान सुरक्षित आहेत. अनेकजण बेपत्ता असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.'
सिम्फोरोपोल असे युक्रेनच्या जलसमाधी मिळालेल्या युद्ध नौकेचे नाव असून, नौदलच्या एका ड्रोनने युद्ध नौकेला उद्ध्वस्त केले. ही युद्ध नौका युक्रेनची सर्वात मोठी होती, असे सांगितले जात आहे. २०१९ मध्ये ही युद्ध नौका तयार केली गेली आणि त्यानंतर दोन वर्षांनी नौदलात दाखल झाली होती. २०१४ नंतर कीवकडून तयार करण्यात आलेले हे सर्वात मोठी युद्ध नौका होती.