नवी दिल्ली : भारत आणि ब्रिटनमध्ये झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे भारताला मोठा फायदा होणार आहे. या व्यापार करारामुळे निर्यात क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढ असून, त्यात सुमारे ८६,००० कोटी ते १.१ लाख कोटींपर्यंत वाढ होऊ शकते.दोन्ही देशांना किती फायदा होणार? भारत आणि ब्रिटनमध्ये २०२४ पर्यंत जवळपास पाच लाख कोटी रुपयांचा व्यापार झाला. मुक्त व्यापार करारानंतर २०४० पर्यंत दोन्ही देशांतील व्यापारात दरवर्षी २५.५ अब्ज पौंड म्हणजेच २.७३ लाख कोटी रुपयांनी वाढेल, अशी अपेक्षा करत आहेत. २०३० पर्यंत दोन्ही देशांतील व्यापार जवळपास १२० अब्ज पौंड म्हणजे १२.८४ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची आशा व्यक्त केली जात आहे. वस्त्रोद्योग, सागरी उत्पादने, चामडे, खनिजे, कागद, फर्निचर, पादत्राणे, खेळणी, रत्न-आभूषणे, ऑटो पार्ट्स, इंजिनिअरिंग उत्पादने, जैविक रसायने या भारतीय उद्योगांना फायदा होईल.
भारताला होणारे फायदे भारतातून ब्रिटनमध्ये होणाऱ्या ९९% निर्यातीवर कर नसेल. आयटी, आर्थिक सेवा, शिक्षण यांसारख्या सेवा पुरवणाऱ्या भारतीयांना अधिक संधी मिळतील. शेफ, योग प्रशिक्षक, फ्रिलान्सर यांना सेवांमध्ये सवलत मिळेल. रोजगार संधी निर्माण होतील. ब्रिटनमध्ये काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षेसाठी भराव्या लागणाऱ्या करात तीन वर्षांची सूट मिळेल. यामुळे भारतीय कंपन्यांची सुमारे ४,००० कोटी रुपयांची बचत होऊ शकते.
ब्रिटनमधील कोणत्या वस्तू भारतात मिळतील स्वस्त? भारत ब्रिटनकडून येणाऱ्या ९० टक्के वस्तूंवर टप्प्याटप्प्याने आयात शुल्क कमी करणार आहे. विशेषतः स्कॉच व्हिस्कीवरील कर १५० टक्क्यांवरून ७५ टक्के आणि पुढे ४० टक्क्यांपर्यंत कमी केला जाईल. यामुळे स्कॉच व्हिस्की स्वस्त होईल. सध्या १०० टक्क्यांपेक्षा जास्त आयात शुल्क असलेल्या ब्रिटिश कार्स फक्त १० टक्के आयात शुल्कासह भारतात येतील. यामुळे स्वस्त होतील.वैद्यकीय उपकरणे, सौंदर्यप्रसाधने, औषधे, विमानाचे सुटे भाग, इलेक्ट्रॉनिक्स आणि काही खाद्यपदार्थांवरील आयात शुल्क कमी झाल्याने या ब्रिटनमधून भारतात आयात होणाऱ्या या वस्तू स्वस्त होतील.