दुबईमध्ये कामासाठी गेलेल्या तेलंगणातील तीन भारतीय नागरिकांवर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आणि एक जण गंभीर जखमी झाला. ११ एप्रिल रोजी दुबईतील एका बेकरीमध्ये ही घटना घडली जिथे हे तीन जण काम करत होते. कुटुंबीयांचा आरोप आहे की, हा हल्ला एका पाकिस्तानी व्यक्तीने केला, जो धार्मिक घोषणा देत बेकरीमध्ये घुसला आणि त्याने तलवारीने हल्ला केला.
निर्मल जिल्ह्यातील सौन गावातील रहिवासी ३५ वर्षीय अष्टपू प्रेमसागर याचा हल्ल्यात मृत्यू झाला. त्याचे काका ए. पोशेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमसागर गेल्या ५-६ वर्षांपासून दुबईतील एका बेकरीमध्ये काम करत होता. दोन वर्षांपूर्वी भारतात आला होता. काम करत असताना आरोपीने त्याच्यावर तलवारीने हल्ला केला आणि त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं की, प्रेमसागर त्याची पत्नी आणि दोन लहान मुलांसह राहतो. कुटुंबाने सरकारकडे मृतदेह भारतात आणण्याची आणि कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची विनंती केली आहे. निजामाबाद जिल्ह्यातील श्रीनिवास याचाही या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी या माहितीला दुजोरा दिला. या घटनेत जखमी झालेल्या तिसऱ्या व्यक्तीचं नाव सागर असं आहे, ज्याच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. सागरची पत्नी भवानी हिने निजामाबादमध्ये बोलताना सरकारला मदत करण्याचं आवाहन केलं आहे.
संपूर्ण तेलंगणामध्ये या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शोक व्यक्त केला. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिल्याचं रेड्डी यांनी म्हटलं आहे.