पाकिस्तानात पोलिओचे आणखी दोन नवे रुग्ण
By Admin | Updated: September 22, 2014 03:19 IST2014-09-22T03:19:24+5:302014-09-22T03:19:24+5:30
पाकिस्तानात पोलिओचे आणखी दोन रुग्ण असल्याचे समोर आल्यामुळे यावर्षीच्या पोलिओ रुग्णांची संख्या १६६ झाली आहे.

पाकिस्तानात पोलिओचे आणखी दोन नवे रुग्ण
इस्लामाबाद : पाकिस्तानात पोलिओचे आणखी दोन रुग्ण असल्याचे समोर आल्यामुळे यावर्षीच्या पोलिओ रुग्णांची संख्या १६६ झाली आहे. उत्तर- पश्चिम प्रांतातील खैबर पख्तुनख्वातील एक (१६ महिने) व दुसरा रुग्ण (८ महिने) कबायली प्रांतातील असून दोघीही मुली आहेत. पेशावरमध्ये पोलिओचे कित्येक रुग्ण उघडकीस आले असून याचे निर्मूलन करण्यात अधिकाऱ्यांना अद्याप यश आलेले नाही. पोलिओचा डोस हा इस्लामच्या विरोधात असल्याचे तालिबानींचे म्हणणे असून त्यांनी त्याला प्रतिबंध केला आहे. मुस्लिम नवे जीव जन्माला घालण्यास असमर्थ ठरावेत यासाठी पश्चिमी राष्ट्रांचा हा कट असल्याचाही त्यांचा आरोप आहे. २०१२ मध्ये पोलिओचे ५८, तर २०१३ मध्ये तेच रुग्ण ९३ झाले होते. नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ हेल्थच्या अधिकाऱ्याने पोलिओचे दोन रुग्ण आढळल्याचे मान्य केले. (वृत्तसंस्था)