इमरान खानसे कहो, मुझे वीजा दे दे..

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 05:18 AM2022-01-20T05:18:59+5:302022-01-20T05:19:23+5:30

ऐंशीच्या घरात असलेल्या या दोघा भावांची भेट झाली, तेव्हा दोघांच्याही डोळ्यांतून एकाच वेळी आनंदाश्रू आणि दु:खाश्रू वाहत होते. कारण त्यांची भेट तर झाली; पण थोड्याच वेळात ते एकमेकांपासून पुन्हा दुरावरणारही होते.

Two Brothers Separated During Partition Meet After 74 Years At Kartarpur | इमरान खानसे कहो, मुझे वीजा दे दे..

इमरान खानसे कहो, मुझे वीजा दे दे..

Next

भारत-पाकिस्तानच्या फाळणीनं किती रक्तपात झाला, किती हिंसाचार झाला, किती कुटुंबे उद्ध्वस्त झाली आणि किती आप्त एकमेकांपासून कायमचे दुरावले याची गणती नाही. फाळणीला इतकी  वर्षे उलटून गेली, पण अनेकांसाठी त्या जखमा अजूनही हळहळत्या आणि ताज्या आहेत. फाळणीने दुरावलेल्या दोन सख्ख्या भावांची अशीच सुन्न करणारी एक कहाणी अलीकडेच चर्चेचा विषय झाली. त्यातील एक भाऊ राहतो भारतात, तर दुसरा पाकिस्तानात. तब्बल ७४ वर्षांनी या दोघांची भेट झाली, तीही काही तासांसाठी. ऐंशीच्या घरात असलेल्या या दोघा भावांची भेट झाली, तेव्हा दोघांच्याही डोळ्यांतून एकाच वेळी आनंदाश्रू आणि दु:खाश्रू वाहत होते. कारण त्यांची भेट तर झाली; पण थोड्याच वेळात ते एकमेकांपासून पुन्हा दुरावरणारही होते. जे लोक त्यांची ही हृदयद्रावक भेट पाहत होते, त्यांनाही आपले अश्रू अनावर झाले होते.  ही भेट झाली ती करतारपूरसाहिब कॉरिडॉर येथे. 

शिखांचे सर्वांत प्रमुख तीर्थक्षेत्र करतारपूर येथील गुरुद्वारा दरबार साहिब हे पाकिस्तानात आहे; पण भारत-पाकिस्तानातील संबंध गेल्या अनेक वर्षांपासून ताणलेले असल्याने भारतीय शीख बांधवांना याठिकाणी जाता येत नव्हते. शेवटी दोन्ही देशांत करार होऊन करतारपूर येथील गुरुद्वारात जाण्यासाठी भारताच्या नागरिकांना नोव्हेंबर २०१९ मध्ये परवानगी देण्यात आली. त्यानंतर सर्व धर्मांच्या भारतीय यात्रेकरूंना ४.५ किलोमीटर लांबीच्या या मार्गाने वर्षभर व्हिसामुक्त प्रवास करण्याची मुभा मिळाली, पण कोरोनामुळे चार महिन्यांतच हा मार्ग बंद करण्यात आला. कोरोनाचा प्रकोप कमी झाल्यानंतर नोव्हेंबर २०२१ मध्ये पुन्हा हा मार्ग खुला करण्यात आला. 

या दोघांतील मोठे बंधू मोहम्मद सिद्दीक हे पाकिस्तानातील फैजलाबाद जिल्ह्यात राहातात, तर लहान भाऊ हबीब हे भारतात भठिंडा जिल्ह्यातील फुलवाला गावात एका शीख कुटुंबाच्या आधाराने राहातात. त्यांनी लग्न केलेले नाही. सिद्दीक यांचा कुटुंबकबिला मात्र मोठा, जवळपास ५० जणांचा आहे. 
एकमेकांपासून दूर जाण्याची त्यांची कहाणीही मोठी हृदयस्पर्शी आहे. आपल्या आठवणींबाबत मोठे बंधू सिद्दीक म्हणतात, ज्यावेळी आमची एकमेकांशी ताटातूट झाली त्यावेळी मी साधारण दहा वर्षांचा होतो, तर छोटा हबीब दोन वर्षांचा. जालंधरमधील जागरावां गावात आम्ही राहत होतो. त्यावेळी आमची आई लहान हबीबला घेऊन आपल्या माहेरी, फुलवाला या गावात गेलेली होती. त्यानंतर थोड्याच दिवसांत आमच्या गावावर हल्ला झाला. लोक जीव घेऊन पळाले. वडील, मी आणि बहीण सोबत होतो. कसं माहीत नाही, पण प्रवासात वडिलांचं निधन झालं. आम्ही भाऊ-बहीण कसेतरी फैजलाबाद येथील रेफ्युजी कॅम्पमध्ये पोहोचलो. बहीण तिथे आजारी पडली आणि तिचंही तिथेच निधन झालं. मी अक्षरश: एकटा पडलो. आश्चर्य म्हणजे मला शोधत माझे काका रेफ्युजी कॅम्पपर्यंत पोहोचले आणि ते मला घेऊन गेले. 

लहान भाऊ मोहम्मद हबीब यांना मात्र काहीच आठवत नाही. हबीब म्हणतात, या गावात माझ्या नात्यात कोणीच नाही. आईबरोबर आजोळी आलो आणि लगेच दंगे सुरू झाले. आम्ही इथेच फसलो. चौकशी केल्यावर कळलं, माझे वडील, बहीण सगळे मारले गेले आहेत. मोठ्या भावाचा काहीच पत्ता लागला नाही. आईला हे कळल्यावर तिला प्रचंड मानसिक धक्का बसला. त्यातच तिनंही प्राण सोडला. गावातल्या शीख बांधवांनी मग माझं पालनपोषण केलं. तेच माझं सर्वस्व आहेत.

इतकी वर्षे कोणालाच एकमेकांचा ठावठिकाणा माहीत नव्हता, तरीही त्यांची भेट झाली कशी?
मोहम्मद सिद्दीक म्हणतात, माझं मन मला कायम सांगत होतं, माझा भाऊ जिवंत असावा. अख्ख्या गावाला माझी कहाणी माहीत होती. पीर आणि फकिरांनाही मी माझ्या भावाबद्दल विचारलं, त्यांनीही सांगितलं, कोशीश करो, तुम्हारा भाई मिल जाएगा.

एक दिवस नासीर ढिल्लों सिद्दीक यांच्याकडे आले. फाळणीदरम्यान ‘हरवलेल्या’ लोकांना एकत्र आणण्यासाठी एक यू-ट्यूब चॅनल ते चालवितात. त्यांनी सिद्दीक यांची सगळी कहाणी आपल्या यू-ट्यूब चॅनलवर प्रसारित केली. हबीब यांच्या गावातील डॉ. जगफीर सिंह यांनी ही स्टोरी पाहिली. त्यानंतर या दोन्ही भावांचा दोन वर्षांपूर्वी पहिला ‘ऑडिओ-व्हिडिओ’ संपर्क झाला आणि आता प्रत्यक्ष भेट!

या भेटीत दोघांनीही आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. आपल्या कुटुंबियांच्या आठवणी काढल्या. अर्थातच हबीब यांना पूर्वीच्या घटनांबद्दल आता काहीच आठवत नाही. कारण त्यावेळी ते लहान होते. 

इथे ये, अजूनही तुझे लग्न लावून देतो!
दोघाही भावांना आता एकत्र राहायचे आहे. मोठे भाऊ सिद्दीक तर गंमतीने म्हणतात, हबीब, तू पाकिस्तानला ये, मी तुझे लग्नही लावून देतो! पण त्यांच्या एकत्र येण्यात व्हिसाचा प्रश्न खूप मोठा आहे. हबीबही सिद्दीक यांना म्हणतात, इमरान खान से कहो, मुझे वीजा दे, भारत में मेरा कोई नहीं है.. गावातील लोकांचा मी खूप ऋणी आहे; पण मला आता कुटुंबासोबत राहायचंय. आयुष्यभर मी खस्ता खाल्ल्या, पण आता मला माझा भाऊ, त्याचे नातू, पणतू यांच्याबरोबर राहायचे आहे. मेल्यावर माझी अंत्येष्टी माझ्या नातेवाइकांनी करावी ही माझी शेवटची इच्छा आहे.

Web Title: Two Brothers Separated During Partition Meet After 74 Years At Kartarpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.