वॉशिंग्टन : कर कपात आणि प्रशासकीय खर्चातील बचतीसंदर्भात अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रस्तावित बिग ब्युटिफूल विधेयकाचे आता कायद्यात रुपांतर झाले आहे. अमेरिकी काँग्रेसच्या मंजुरीनंतर ट्रम्प यांनी शुक्रवारी बिग ब्युटिफूल विधेयकावर स्वाक्षरी केली.
व्हाइट हाउसच्या कर्मचाऱ्यांबरोबर पिकनिकवर असताना ट्रम्प यांनी ही स्वाक्षरी केली. त्यामुळे आता वैद्यकीय सुविधांमध्ये मिळणाऱ्या सवलतींमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली जाईल. तर, सीमा सुरक्षा, लष्कर तसेच अनधिकृत नागरिकांच्या सामूहिक हद्दपारीसाठी निधी वाढविला जाईल.
बिग ब्युटिफूलची चर्चा
गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प यांचे हे ‘बिग ब्युटिफूल’ म्हणून ओळखले जाणारे विधेयक चर्चेत होते. या विधेयकाला डेमोक्रॅटसनी कडवा विरोध केला असला तरी रिपब्लिकन पक्षाचा त्यांना दमदार पाठिंबा मिळाला. २१८ विरुद्ध २१४ अशा मोठ्या बहुमताने हे विधेयक मंजूर झाले. गुरुवारी काँग्रेसमधील आपला विजय ट्रम्प यांनी जल्लोषात साजरा केला होता.
डेमोक्रॅटिकची तयारी
बिग ब्युटिफूल बिल मंजूर झाल्यानंतर याचा जनभावनेचा आगामी निवडणुकीत लाभ घेण्यासाठी विरोधीपक्ष असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. या माध्यमातून आपल्याला सत्तेत परतता येईल, असा पक्षाचा दावा आहे.
पाक-अमेरिकेतील व्यापार वाटाघाटीचा टप्पा पूर्ण
इस्लामाबाद : पाकिस्तान व अमेरिका या देशांमध्ये व्यापार वाटाघाटीचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला. ज्यात देशाच्या प्रमुख निर्यातक्षेत्रांचे भविष्य घडवू शकणाऱ्या करारांवर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे.
पंतप्रधान टेरिफसंबंधी मुदतीसमोर नमते घेतील : राहुल गांधी
नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्या एका वक्तव्याचा दाखला देत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी दावा केला की डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफबाबत दिलेल्या मुदतीसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी सहज झुकतील.
उद्योगमंत्री गोयल यांनी शुक्रवारी म्हटले होते की, अशा वेळेच्या मर्यादेआधारे भारत कोणताही व्यापार करार करीत नाही. अमेरिकेशी नियोजित व्यापार कराराला अंतिम रूप दिल्यावरच तो स्वीकारला जाईल. राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय होईल.
राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर याबाबत म्हटले आहे की, ‘भलेही पीयूष गोयल कितीही छातीठोकपणे सांगोत, माझ्या शब्दांकडे लक्ष द्या, ट्रम्प यांच्या टेरिफसंबंधी वेळेच्या मर्यादेसमोर मोदी सहजपणे नमते घेतील.’