मध्य पूर्वेतील भू-राजकीय परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली असून, अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. अमेरिकेने गेल्या २४ तासांत घेतलेल्या दोन मोठ्या निर्णयांनी जगभरात खळबळ माजली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या लष्करी इशाऱ्यानंतर अमेरिकेने लेबनॉनमधील आपल्या दूतावासातून कर्मचाऱ्यांना तातडीने माघारी बोलावले आहे. त्याचबरोबर परराष्ट्र मंत्री मार्को रूबिओ यांचा नियोजित इस्रायल दौराही अचानक रद्द करण्यात आला असून, यामुळे युद्धाची चिन्हे अधिक गडद झाली आहेत.
दूतावास रिकामे करण्याचे आदेश का?
लेबनॉनची राजधानी बेरूत येथील अमेरिकन दूतावासातील 'बिगर-गरजेच्या' कर्मचाऱ्यांना तातडीने मायदेशी परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने स्पष्ट केले आहे. सोमवारी जवळपास ३२ कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बेरूत विमानतळावरून प्रस्थान केले. एकूण ५० कर्मचाऱ्यांना तातडीने लेबनॉन सोडण्यास सांगण्यात आले असून, सध्या केवळ अत्यावश्यक कर्मचारीच तिथे तैनात राहतील.
मार्को रूबिओंचा दौरा रद्द, चर्चेला उधाण
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रूबिओ हे इस्रायलच्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, ऐनवेळी हा दौरा स्थगित करण्यात आला आहे. रूबिओ यांचा दौरा रद्द होण्यामागे अधिकृत कारण दिले नसले तरी, इराणसोबत वाढलेला तणाव आणि कोणत्याही क्षणी सुरू होऊ शकणारी लष्करी कारवाई हेच मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे.
ट्रम्प यांचा १० दिवसांचा अल्टिमेटम
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकत्याच दिलेल्या एका विधानाने इराणच्या गोटात घबराट पसरली आहे. "येत्या १० दिवसांत इराणशी करार होणार की अमेरिका थेट लष्करी कारवाई करणार, हे जगाला समजेल," अशा शब्दांत ट्रम्प यांनी गर्भित इशारा दिला आहे. इराण अण्वस्त्र निर्मितीच्या दिशेने वेगाने पावले उचलत असल्याचा अमेरिका आणि युरोपीय देशांचा आरोप आहे. जर इराणने आपला अट्टाहास सोडला नाही, तर अमेरिका मोठ्या लष्करी कारवाईच्या तयारीत आहे.
इराणचा प्रतिहल्ला करण्याचा इशारा
ट्रम्प यांच्या इशाऱ्याला इराणनेही जशास तसे उत्तर दिले आहे. "जर अमेरिकेने हल्ला केला, तर आम्ही शांत बसणार नाही. मध्य पूर्वेतील अमेरिकेचे लष्करी तळ आणि त्यांचे हितसंबंध आमचे मुख्य लक्ष्य असतील," अशी धमकी इराणने दिली आहे.
हिजबुल्लाह आणि जुन्या जखमा
अमेरिकेला लेबनॉनमधील 'हिजबुल्लाह' या संघटनेचा मोठा धोका वाटत आहे. १९८३ मध्ये बेरूतमध्ये अमेरिकन मरीन बॅरेक्स आणि दूतावासावर झालेल्या भीषण हल्ल्यात शेकडो अमेरिकन नागरिक मारले गेले होते. या हल्ल्यामागे हिजबुल्लाहचा हात होता आणि या संघटनेला इराणचे थेट समर्थन आहे. त्यामुळेच, कोणतीही कारवाई करण्यापूर्वी अमेरिका आपल्या नागरिकांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करत आहे. एकूणच परिस्थिती पाहता, येत्या १० दिवसांत मध्य पूर्वेचे चित्र बदलण्याची शक्यता असून संपूर्ण जगाचे लक्ष आता अमेरिका आणि इराणच्या पुढील पावलांकडे लागले आहे.
Web Summary : Amid rising tensions, Trump threatens military action against Iran. The US is evacuating embassy staff from Beirut and postponing meetings, signaling a potential escalation in the Middle East. Concerns rise over Iran's nuclear ambitions and possible regional conflict.
Web Summary : बढ़ते तनाव के बीच, ट्रंप ने ईरान के खिलाफ सैन्य कार्रवाई की धमकी दी। अमेरिका ने बेरूत से दूतावास कर्मचारियों को निकाला और बैठकें स्थगित की, जिससे मध्य पूर्व में संभावित वृद्धि का संकेत मिलता है। ईरान की परमाणु महत्वाकांक्षाओं और संभावित क्षेत्रीय संघर्ष को लेकर चिंताएँ बढ़ रही हैं।