India America Trump Tariff News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर शुल्क लावण्याची विनंती केल्याचे जी-७ राष्ट्रांच्या बैठकीत अमेरिकेच्या प्रतिनिधींनी सांगितले. रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर शुल्क लावण्याची विनंती अमेरिकेने जी-७ व नाटो देशांना केली आहे. रशिया-युक्रेन संघर्षाच्या माध्यमातून सुरू असलेला नरसंहार थांबविण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज अमेरिकेने व्यक्त केली आहे. यातच भारताने आपली भूमिका स्पष्ट ठेवली आहे. यामुळे आता अमेरिकन मंत्री रडकुंडीला आले असून, हतबल होताना दिसत आहेत.
अमेरिकेने भारतावर मोठा कर लादला आहे. यातच अमेरिकेचे वाणिज्य मंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी भारताच्या व्यापार धोरणांवर टीका केली आहे. भारताने जागतिक व्यापाराचा फायदा घेत बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मर्यादित केल्याचा आरोप लुटनिक यांनी केला आहे. ते एका मुलाखतीत बोलत होते.
भारताला त्याच्या १४० कोटी लोकसंख्येचा अभिमान आहे. परंतु...
लुटनिक म्हणाले की, भारताला त्याच्या १४० कोटी लोकसंख्येचा अभिमान आहे. परंतु अमेरिकेच्या कृषी निर्यातीबाबत भारत फारच मर्यादित वागतो. भारताची लोकसंख्या १४० कोटी असून, आपल्याकडून २५ किलो मक्याचे एक पोते का खरेदी करत नाही? भारत आपला मका खरेदी करत नाही. भारत प्रत्येक गोष्टीवर कर लावत आहे. हे म्हणणे स्वीकारा, नाहीतर जगातील सर्वांत मोठ्या ग्राहकासोबत व्यापार करणे तुमच्यासाठी कठीण होईल. वाढता जागतिक प्रभाव आणि मुक्त बाजारपेठेबाबत निष्पक्ष असल्याचा दावा भारताकडून वारंवार केला जातो. असे असूनही, त्याची संरक्षणवादी भूमिका अमेरिकन व्यवसायांना निराश करत आहे. ही निष्पक्षतेची बाब आहे. अमेरिका भारतीय वस्तू उघडपणे खरेदी करते, परंतु जेव्हा अमेरिकेला विकायची असते तेव्हा भारताकडून धोरणांच्या भिंती उभ्या केल्या जातात, असे लुटनिक म्हणाले.
दरम्यान, अमेरिका आणि इतर देशांनी रशियावर अनेक निर्बंध घातले आहेत. मात्र भारत आपल्या विकासाला चालना देण्यासाठी रशियाकडून तेल खरेदी करत आहे, यामुळे जागतिक व्यापारात असंतुलन निर्माण होत आहे. असे असले तरी अमेरिका आणि भारत संरक्षण, तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात पार्टनर आहेत. आम्ही भारतासोबतचे संबंध कमी करणार नाही, असे लुटनिक यांनी म्हटले आहे.