गाझा पट्टीतील युद्धावरून आता पाकिस्तान आणि इस्रायल यांच्यात शाब्दिक युद्ध पेटले आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याबद्दल अत्यंत वादग्रस्त विधान केले असून, अमेरिकेने त्यांचे अपहरण करावे, अशी मागणी केली आहे. या विधानामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली असून इस्रायलनेही पाकिस्तानच्या दहशतवादी कनेक्शनची आठवण करून देत त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले ख्वाजा आसिफ?
एका मुलाखतीदरम्यान ख्वाजा आसिफ यांनी नेतन्याहू यांना 'मानवतेचा सर्वात मोठा गुन्हेगार' संबोधले. "जर अमेरिकेचा खरोखरच माणुसकीवर विश्वास असेल, तर त्यांनी नेतन्याहूंचे अपहरण केले पाहिजे. ज्याप्रमाणे अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्याबाबत कारवाई केली होती, तसेच पाऊल इस्रायलच्या पंतप्रधानांविरुद्ध उचलावे," असे आसिफ म्हणाले. इतकेच नाही तर, "गेल्या ५ हजार वर्षांत जगाने इतका मोठा गुन्हेगार पाहिला नाही," अशी विखारी टीकाही त्यांनी केली.
इस्रायलचे सडेतोड उत्तर
ख्वाजा आसिफ यांच्या विधानानंतर इस्रायलनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. भारतात असलेले इस्रायलचे राजदूत रूवेन अझार यांनी पाकिस्तानला आरसा दाखवला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'अंतर्गत आंतरराष्ट्रीय सुरक्षा दलात पाकिस्तानी सैन्याचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला इस्रायलने स्पष्ट नकार दिला आहे. "ज्या देशाच्या सैन्याचे हमास आणि लष्कर-ए-तैयबासारख्या दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत, त्यांच्या सहभागाने आम्ही कधीही समाधानी राहू शकत नाही," असे अझार यांनी ठणकावून सांगितले.
पाकिस्तानातून होतेय प्रार्थना
संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पुढे असा दावा केला की, "पाकिस्तानची जनता सध्या बेंजामिन नेतन्याहूंच्या अपहरणासाठी प्रार्थना करत आहे. तुर्कीसारखे देशही हे काम करू शकतात." पाकिस्तानने कधीही इस्रायलला देश म्हणून मान्यता दिलेली नाही, हे विशेष. नेहमीप्रमाणे इराणच्या जवळ जाण्यासाठी पाकिस्तानने पुन्हा एकदा इस्रायलवर आगपाखड केली आहे.
दहशतवादावरून पाकिस्तानची कोंडी
इस्रायलने गाझा फोर्समध्ये पाकिस्तानच्या भूमिकेला कडाडून विरोध दर्शवला आहे. हमास आणि पाकिस्तानस्थित दहशतवादी गट यांच्यातील वाढते संबंध ही जगासाठी चिंतेची बाब असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांच्या नव्या योजनेत पाकिस्तानला स्थान मिळणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Web Summary : Pakistan's minister demanded Netanyahu's abduction, sparking outrage. Israel retorted, highlighting Pakistan's terror links and rejecting their role in Gaza. Tensions escalate.
Web Summary : पाकिस्तानी मंत्री ने नेतन्याहू के अपहरण की मांग करके विवाद खड़ा कर दिया। इजराइल ने पाकिस्तान के आतंकी संबंधों पर पलटवार करते हुए गाजा में भूमिका को खारिज कर दिया। तनाव बढ़ा।