वैमानिकाने दिला होता धोक्याचा संदेश?
By Admin | Updated: February 6, 2015 02:25 IST2015-02-06T02:25:27+5:302015-02-06T02:25:27+5:30
तैवानमध्ये घडलेल्या विमान अपघातात मरण पावलेल्यांची संख्या ३१ वर पोहोचली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कारण अजूनही १२ जण बेपत्ता आहेत.

वैमानिकाने दिला होता धोक्याचा संदेश?
तैपेई : तैवानमध्ये घडलेल्या विमान अपघातात मरण पावलेल्यांची संख्या ३१ वर पोहोचली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कारण अजूनही १२ जण बेपत्ता आहेत. ही दुर्घटना कशी घडली, याबाबत तैवानचे नागरी उड्डयन प्रशासन आणि ट्रान्सएशिया एअरवेजने काहीही ठोस सांगण्यास नकार दिला असला तरी वैमानिकाने विमान ९० अंशांनी कलंडण्याआधी विमान संकटात असल्याचा संदेश दिला होता (मे डे) असे नागरी उड्डयन प्रशासनाच्या अधिकाऱ्याने सांगितले; परंतु त्यांनी दुर्घटनेमागील संभाव्य कारणांबाबत बोलणे टाळले.
ट्रान्स एशियाचे विमान (जीई-२३५-एटीआर ७२-६००) उड्डाणानंतर १० मिनिटांनी हवेत हेलकावे घेत पुलावर धडकत नदीत (किलंग) कोसळले. या विमानात चालक पथक आणि ५८ प्रवासी होते. बेपत्ता सर्व प्रवासी चिनी पर्यटक आहेत. हे विमान किनमेनकडे जात होते. (वृत्तसंस्था)
पुलावर धडकण्याआधी या विमानाचा एक पंखा पुलावरून जाणाऱ्या एका टॅक्सीला धडकला होता. हे विमान कोसळत असताना पुलावरून जाणाऱ्या एका टॅक्सीवरील डॅशबोर्ड कॅमेऱ्याने हा अंतिम क्षण टिपला आहे.
विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाल्याचे तैवानच्या नागरी उड्डयन प्रशासनाने सांगितले. तथापि, नदीतील दलदलीमुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. अग्निशमन दलाचे पाणबुडे नदीच्या तळाशी जाऊन मृतदेह शोधत आहेत.
३१ चिनी प्रवाशांचे नातेवाईक विशेष विमानाने तैवानला पोहोचत आहेत. १५ प्रवाशांना वाचविण्यात आले आहे. यात एका कुटुंबातील तिघांचा समावेश असून यात एका बालकाचाही समावेश आहे.
एटीआर-७२-६०० हे विमान दर्जेदार कंपनीचे असून वैमानिकालाही ४,९०० तास उड्डाणाचा अनुभव होता, असे नागरी उड्डयन प्रशासनाने सांगितले.
आवाज ऐकल्यानंतर आसने बदलली...
हे विमान उड्डाण घेण्यापूर्वीच तैवानी दाम्पत्य आपल्या दोन वर्षांच्या बाळासह डाव्या बाजूकडील आसन बदलत उजव्या बाजूकडील आसनावर स्थानापन्न झाल्याने ते बचावले, असे वृत्त युनायटेड डेलीने दिले आहे. विमानाच्या पंख्यातून येणाऱ्या आवाजामुळे अस्वस्थ वाटू लागल्याने आम्ही जागा बदलली, असे लिन यांनी सांगितल्याचे या वृत्तात म्हटले आहे. नंतर विमान कलंडत नदीत कोसळले. लिनने जागा सोडत आपल्या पत्नीला ओढून वर काढले. आपले बाळ पाण्यात पडल्याचे लिनला दिसले. पाण्यात बुडाल्याने बाळाचा चेहरा आणि ओठ काळे-निळे पडले होते. प्रसंगावधान राखून बाळाच्या छातीवर दाब देऊन (सीपीआर तंत्र) बाळाच्या हृदयाची गती सुरू करण्यात लिन यशस्वी ठरला.
हवाई प्रवास धोकादायक होत आहे का?.....
गेल्या वर्षी एअर मलेशियाचे विमान भर आकाशातून गायब होणे आणि त्यानंतर एअर एशिया विमानाच्या भीषण दुर्घटनेमुळे हवाई प्रवास धोकादायक तर होत नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. विमान दुर्घटनेच्या दृष्टीने मागचे वर्ष अत्यंत दु:खदायी ठरले.
गेल्या वर्षी २१ विमान दुर्घटना घडल्या. विमान दुर्घटनांची ही संख्या कमी आहे. पन्नास वर्षांपूर्वी आजच्या तुलनेत पाच टक्के विमानांची उड्डाणे होत होती; परंतु दुर्घटनेचे प्रमाण चौपट होते.
एअरलाईन रेटिंग डॉट कॉमच्या माहितीनुसार मागच्या वर्षी जगभर विमानसेवा देणाऱ्या व्यावसायिक कंपन्यांच्या विमानांनी २ कोटी ७० लाख उड्डाणे केली. यातून ३.३ अब्ज प्रवाशांनी हवाई सफर केली. (वृत्तसंस्था)