जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले टेस्लाचे सीईओ एलन मस्क सध्या एका वेगळ्याच अडचणीत सापडले आहेत. इन्फ्लुएन्सन एश्ले सेंट क्लेयर नावाच्या महिलेने एलन मस्क यांच्याविरोधात कोर्टात धाव घेत मस्क हे तिच्या पाच महिन्यांच्या मुलाचे वडील अससल्याचा दावा केला आहे. सेंट क्लेयर हिने २१ फेब्रुवारी मेनहॅटन सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. तसेच त्याच एलन मस्क हे तिच्या मुलाचे वडील असल्याचा दावा केला आहे. एलन मस्क यांनी हे आरोप नाकारले आहेत.
मी आणि एलन मस्क यांनी २०२४ च्या जानेवारी महिन्यात बार्थ्सच्या दौऱ्यादरम्यान, मुलाचं प्लॅनिंग केलं होतं, असा दावा सेंट क्लेयर हिने केला आहे. तिने एलन मस्क हेच या मुलाचे वडील आहेत की नाही याची खातरजमा करण्यासाठी मस्क यांना एक डीएनए चाचणी करण्याचे आदेश देणयाची विनंती कोर्टाकडे केली आहे.
कोर्टामध्ये दाखल केलेल्या याचिकेसोबत मस्क यांचा एका नवजात बाळासोबतचा फोटो आणि दोघांमधील संभाषणाच्या कथित मेसेजचे फोटो देण्यात आले आहेत. तसेच एका वेगळ्या याचिकेमध्ये सेंट क्लेयरने केलेल्या दाव्यानुसार बाळाच्या जन्मावेळी एलन मस्क उपस्थित नव्हते. ते या बाळाला केवळ ३ वेळा भेटले आहेत. त्यात त्यांनी दोन वेळा मॅनहॅटन येथे येऊन या बाळाची भेट घेतली आहे, तर एकदा ते टेक्सास येथे भेटले होते.
दरम्यान, एलन मस्क यांच्या वकिलांना याबाबत विचारले असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलन मस्क यांची विविध महिलांशी असलेल्या नत्यांमधून झालेली १२ मुलं आहेत. त्यांनी सेंट क्लेयर हिच्या आरोपांचं थेट उत्तर दिलेलं नाही. मात्र त्यांनी एका वेगळ्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली होती. त्यात सेंट क्लेअर हिने त्यांना बेबी ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला होता, असा दावा करण्यात आला होता.