गेल्या महिन्यात इस्राइल आणि इराण यांच्यात सुरू झालेला संघर्ष अनिर्णितावस्थेत संपला होता. या युद्धात कुठल्याही देशाला स्पष्टपणे विजय मिळाला नाही. दरम्यान, दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाल्यानंतर आता अनेक धक्कादायक गौप्यस्फोट होत आहेत. तसेच या गौप्यस्फोटांमुळे मध्य पूर्वेमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण होऊ शकतो. इस्त्राइल आणि इराणदरम्यान झालेल्या संघर्षादरम्यान, इस्रालने इराणच्या राष्ट्रपतींची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
१५ जून रोजी तेहरानमध्ये इराणचे राष्ट्रपती मसूद पेसेश्कियन यांच्यासोबत संसदेचे अध्यक्ष आणि न्यायपालिकेच्या प्रमुखांना एकत्रितरीत्या संपवण्याचा प्रयत्न इस्राइलने केला होता. या हल्ल्यात इस्राइलच्या राष्ट्रपतींच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. तर इतर अधिकारी हे आपातकालीन मार्गाने सुरक्षितरीत्या बाहेर पडून जीव वाचवण्यात यशस्वी झाले. हा हल्ला इराणच्या सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलच्या बैठकीला लक्ष्य करून करण्यात आला होता.
याबाबत फार्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार इस्राइली क्षेपणास्त्रांनी ही बैठक जिथे झाली त्या सभागृहाच्या प्रवेशद्वारापासून बाहेर पडण्याच्या मार्गापर्यंत सर्व मार्गांना लक्ष्य केलं होतं. या हल्ल्यासाठी एकूण सहा क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला होता. या हल्ल्यात या इमारतीच्या चहुबाजूला प्रचंड विध्वंस झाला. मात्र बैठकीला आलेले अधिकारी आपातकालीन मार्गाने बाहेर निसटण्यात यशस्वी झाले.
दरम्यान, आता इस्राइलला एवढ्या गोपनीय बैठकीची माहिती कशी काय मिळाली? हा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच इराणच्या वरिष्ठांच्या आसपास कुणी हेर उपस्थित होता का जो आतील सर्व माहिती इस्राइलला देत होता, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच इराणच्या गुप्तचर यंत्रणेकडून याबाबतच्या तपासाला सुरुवात झाली आहे. इराणचे राष्ट्रपती पेसेश्कियन यांनीही या हल्ल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, हो त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो अयशस्वी ठरला. मात्र इस्राइलकडून याबाबत कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
इस्राइलच्या हवाई दलाशी संबंधित सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार या मोहिमेदरम्यान, इस्राइलचं एक एफ-१५ लढाऊ विमान इराणच्या सीमेमध्ये घुसताच तांत्रिक बिघाडामुळे नादुरुस्त झालं होतं. त्यामुळे या विमानाला खाली उतरवण्याची वेळ आली होती. या विमानाच्या इंधन टाकीमध्ये काही बिघाड झाला होता. दरम्यान, इंधनवाहू विमान वेळेत दाखल झाल्याने या विमानात इंधन भरले गेले. त्यानंतर या विमानाने आपली मोहीम पूर्ण केली.