पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताकडून दहशतवादी आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करण्याचे संकेत देण्यात येत आहेत. त्यामुळे सध्या पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात धावपळ उडाली असून, भारताच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी तयारी केली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात इस्लामाबादमधील लाल मशिदीचे मौलवी मौलाना अब्दुल अजित गाझी हे भारताविरोधात लढण्यास इच्छूक असणाऱ्यांनी हात वर करा असं आवाहन करताना दिसत आहेत. मात्र त्यांच्या या आवाहनानंतर त्याठिकाणी भयाण शांतता पसरते.
लाल मशिदीमध्ये विद्यार्थी आणि इतर अनुयायांना संबोधित करताना गाझी म्हणाले की, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, जर पाकिस्तान भारताविरोधात लढला, तर तुमच्यापैकी किती जण पाकिस्तानला पाठिंबा देतील? तसेच पाकिस्तानसाठी लढतील? या प्रश्नाला प्रतिसाद देताना कुणीही हात वर केला नाही. तेव्हा मौलाना म्हणाले की, याचा अर्थ असा आहे की, सारं काही स्पष्ट आहे. कुणाला काही सांगण्याची गरज नाही.
पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथील मौलाना गाझी यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिफ मुनीर आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. तसेच त्यांनी शाहबाज शरीफ आणि त्यांच्या मंत्रिमंडळालाही सांभाळून राहण्याचा सल्ला दिला आहे. पाकिस्तानी लष्कर बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा येथे आपल्याच देशाच्या नागरिकांवर अत्याचार करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.