अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही ऑडिओ क्लिप समोर आल्या आहेत. यात ते रशिया आणि चीनवर बॉम्ब टाकायची धमकी देताना दिसत आहेत. असे किमान तीन ऑडिओ लिक झाले आहेत. या ऑडिओमध्ये ट्रम्प अत्यंत रागात दिसत आहेत आणि पुतीन तथा जिनपिंग यांच्या संदर्भात अत्यंत वाईट बोलत आहेत. वारंवार समजावूनही पुतीन गंभीर नाहीत, असे ते म्हणत आहेत. याशिवाय, ते याच पद्धतीने तैवानच्या मुद्द्यावरही जिनपिंग यांच्यासंदर्भात असेच बोलताना दिसत आहेत.
माध्यमांतील वृत्तांनुसार, ट्रम्प हे सर्व, 2024 मध्ये निवडणूक देणगीदारांच्या कार्यक्रमात बंद दाराआड बोलले आहेत. “२०२४ : हाऊ ट्रम्प रीटूक द व्हाईट हाऊस…” या पुस्तकातून लीक झालेल्या ऑडिओ टेप्समध्ये ट्रम्प रशिया आणि चीनसंदर्भात अत्यंत आक्रमक भाषा वापरताना ऐकू येत आहेत.
पुतीन यांना धमकी - एका ऑडिओमध्ये ट्रम्प म्हणत आहेत, “मी पुतीन यांना म्हणालो, जर तुम्ही युक्रेनमध्ये प्रवेश केला, तर मी मॉस्कोवर बॉम्ब टाकेन. पुतीन म्हणाले, ‘मला विश्वास नाही’ मी म्हणालो, ‘करेन’”. पुढे ट्रम्प यांनी दावा केला की, पुतीन यांना त्यांच्या धमकीची “१० टक्के खात्री पटली.”
जिनपिंग यांनाही अशीच धमकी - आणखी एका क्लिपमध्ये ट्रम्प दावा करताना दिसत आहेत की, “मी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना म्हणालो, जर तुम्ही तैवानवर हल्ला केला तर, मी बीजिंगला बॉम्बने उडवेन.” “ते म्हणाले, बिजिंग? खरंच? मी म्हणालो, हो, माझ्याकडे दुसरा पर्याय नाही.” याशिवाय, जिनपिंग यांनाही त्यांच्या धमकीवर "10 टक्के" विश्वास बसला आणि हे पुरेसे होते, असा दावाही त्यांनी केला.