बीजिंग - मध्य पूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चीनने हिंद महासागरात भारताला वेढा घालण्याच्या आपल्या नवीन धोरणाची अंमलबजावणी सुरू केली आहे. हे साध्य करण्यासाठी चीनने गृहयुद्धाशी झुंजत असलेल्या भारताचा शेजारी देश म्यानमारचा प्याद्यासारखा वापर केला आहे. म्यानमारमार्गे युनान, सिचुआन आणि गुइझोउ या अंतर्गत प्रांतांपर्यंत नवीन व्यापारी मार्ग उघडण्यासाठी चीन प्रयत्न करत आहे. ही योजना किमान ४० वर्षे जुनी आहे, परंतु या प्रकल्पाला अलीकडे मिळालेल्या गतीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.
म्यानमारमार्गे या तीन प्रांतांना हिंद महासागराशी जोडण्याचे चीनचे उद्दिष्ट आहे. यामुळे या प्रांतांना चिनी बंदरांपर्यंत पोहोचण्यासाठी लांब पल्ल्याच्या रस्ते आणि रेल्वेच्या अविकसित जाळ्यावर अवलंबून न राहता बाहेरील जगाशी व्यापार करणे शक्य होईल. असे झाल्यास बंगालच्या उपसागरापासून हिंद महासागरापर्यंत भारतासमोर एक नवीन आव्हान उभे राहील.
म्यानमारमध्ये चीन काय करतंय?
चीनने या प्रकल्पाला "चीन-म्यानमार आर्थिक कॉरिडॉर" (CMEC) असे नाव दिले आहे. तज्ञांच्या मते हा प्रकल्प केवळ व्यापारी मार्ग विकसित करण्यापुरता मर्यादित राहणार नाही उलट, चीन बंगालच्या उपसागरात आपला राजकीय आणि लष्करी प्रभाव वाढवण्यासाठी त्याचा वापर करेल. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे सागरी अस्थिरता शिगेला पोहोचली आहे. या संदर्भात म्यानमारमार्फत दीर्घकालीन सामरिक उद्दिष्टे साध्य करणे हे चीनच्या सुरक्षा नियोजकांसाठी पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाचे झाले आहे. चीन या मार्गाद्वारे एक पर्यायी व्यापारी मार्ग विकसित करण्याचाही प्रयत्न करत आहे, ज्याचा उपयोग तो संकटाच्या काळात करू शकेल. यामुळे चीनची आर्थिक आणि लष्करी शक्ती वाढेल आणि त्याची जोखीम पत्करण्याची क्षमताही वाढेल.
चीनसाठी हिंद महासागर किती महत्त्वाचा?
आकडेवारीनुसार, चीनच्या आयात केलेल्या कच्च्या तेलापैकी सुमारे ८० टक्के तेल हिंद महासागरातून येते. इराण हा त्याचा मुख्य तेल पुरवठादार आहे. चीन रशिया आणि इतर मध्य आशियाई देशांकडून पाइपलाइनद्वारे नैसर्गिक गॅस आयात करतो. तरीही त्याच्या गॅस आयातीपैकी ३० ते ६० टक्के गॅस वाहतूक हिंद महासागरातूनच होतो. चीन आफ्रिकेतून मोठ्या प्रमाणात खनिजे देखील आयात करतो, जी जहाजांद्वारे हिंद महासागरातून चीनच्या पूर्वेकडील बंदरांपर्यंत पोहोचवली जातात. याशिवाय, मध्य पूर्व, युरोप आणि आफ्रिकेतील बाजारपेठांमध्ये माल निर्यात करण्यासाठी चीन हिंद महासागरावर अवलंबून आहे. एकूणच, चीनचा सुमारे ६५ टक्के सागरी व्यापार हिंद महासागरातून होतो.
होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे चीनला चिंता
इराणवर इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांपासून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारा व्यापार जवळजवळ थांबला आहे. याचा चीनच्या तेल आणि गॅस आयातीवर गंभीर परिणाम झाला आहे. चीन अनेक दशकांपासून इराणचा एक प्रमुख मित्रराष्ट्र राहिला आहे. त्यामुळे भविष्यात तणाव वाढल्यास चीनला मलाक्काच्या सामुद्रधुनीतून जाणे कठीण होऊ शकते हे चीनला माहित आहे. मलाक्काची सामुद्रधुनी हा हिंद महासागरापासून दक्षिण चीन समुद्रापर्यंत जाणारा एक अरुंद सागरी मार्ग आहे. त्यामुळे चीन मलाक्काची सामुद्रधुनी ओलांडल्याशिवाय आपल्या देशात तेल आणि गॅसची वाहतूक करण्यासाठी पर्यायी मार्गांवर वेगाने काम करत आहे. म्यानमारमधून बांधला जात असलेला आर्थिक कॉरिडॉर हा देखील चीनच्या धोरणाचा एक भाग आहे. चीन केवळ याच मार्गावर काम करत नाही. पाकिस्तानचे ग्वादर बंदर देखील अशाच धोरणांतर्गत विकसित केले गेले आहे.
भारताचं टेन्शन वाढणार
हिंद महासागरातील चीनच्या वाढत्या हालचालींमुळे भारताचा तणाव वाढू शकतो. चीन म्यानमारमार्गे जो नवीन कॉरिडॉर विकसित करत आहे, तो भारताच्या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या अंदमान आणि निकोबार बेटांजवळून जाईल. यामुळे बंगालच्या उपसागरात चिनी जहाजे आणि युद्धनौकांची उपस्थिती वाढेल. बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर भारतीय नौदलाचे अनेक महत्त्वाचे तळ आहेत, ज्यात विशाखापट्टणम येथील भारतीय नौदलाच्या पूर्व कमांडचे मुख्यालय आणि आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमजवळ रामबिल्ली येथे असलेला भारतीय अणु-पाणबुड्यांचा मुख्य आणि सर्वात सुरक्षित परिचालन तळ, आयएनएस वर्षा यांचा समावेश आहे.
Web Summary : China uses Myanmar to access the Indian Ocean, circumventing Malacca Strait. This corridor poses strategic challenges for India near Andaman & Nicobar Islands, increasing Chinese naval presence and threatening Indian naval bases.
Web Summary : चीन, मलक्का जलडमरूमध्य को दरकिनार करते हुए, हिंद महासागर तक पहुँचने के लिए म्यांमार का उपयोग कर रहा है। यह गलियारा अंडमान और निकोबार द्वीप समूह के पास भारत के लिए रणनीतिक चुनौतियाँ पेश करता है, जिससे चीनी नौसेना की उपस्थिति बढ़ती है और भारतीय नौसेना के ठिकानों को खतरा होता है।