भूमिगत रेल्वे, भूमिगत मेट्रो स्टेशन किती धोकादायक ठरू शकतात, याचे उदाहरण बँकॉकमध्ये समोर आले आहे. एका व्यस्त रस्त्याखाली भूमीगत रेल्वे स्थानकाचे काम सुरु होते. बुधवारी सकाळच्या सुमारास अचानक या रस्त्यावरील चौकात मोठ्ठा खड्डा पडला आणि वाहनांसह भला मोठा भाग जमिनीखाली गाडला गेला. या घटनेचा भयावह व्हिडीओ समोर येत आहे.
थायलंडची राजधानी बँकॉकच्या रस्त्यावर एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या रस्त्यावरील वाहने जमिनीने गिळंकृत केली आहेत. साउथ चायना पोस्टच्या वृत्तानुसार, बुधवारी पहाटे बँकॉकमधील रुग्णालयासमोर ५० मीटर खोल खड्डा पडला होता. या खड्ड्याने काही क्षणांतच मोठे रुप घेतले आणि वाहनांसह विजेचे पोलही त्यात गाडले गेले.
सरकारी अधिकाऱ्यांनुसार जवळच्या भूमिगत रेल्वे स्टेशनच्या कामामुळे हा अपघात घडला आहे. सकाळी ७ वाजताच्या सुमारास एका मोठ्या भगदाडामुळे पाण्याची पाईपलाईन फुटली होती. यामुळे रस्ता बंद करण्यात येत होता. परंतू, त्याच्या आजुबाजुला काही वाहने व नागरिक होते. थोड्यावेळाने या भगदाडाचे स्वरुप वाढले आणि तिथे थांबलेल्या लोकांनी आपली वाहने मागे घेण्यास सुरुवात केली. तसेच तिथून दूर गेले. परंतू, काही वाहने ही आतमध्ये पडली.
येत्या काही दिवसांत सुपर टायफून रागासा धडकणार आहे, यामुळे बँकॉकमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशातच हा मोठा खड्डा तयार झाल्याने आजुबाजुच्या इमारतींना धोका निर्माण झाला आहे.