PM Paetongtarn Shinawatra leaked call: थायलंडच्यापंतप्रधान पतोंगटोर्न शिनावात्रा यांना एका फोन कॉलमुळे त्यांचे पद गमवावे लागले. थायलंडच्या संवैधानिक न्यायालयाने त्यांना तात्पुरते पदावरून निलंबित केले आहे. या फोन कॉल दरम्यान काही संवेदनशील गोष्टी उघड झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मंगळवारी, थायलंडच्या संवैधानिक न्यायालयाने पॅटोंगटोर्न यांच्याविरुद्धची याचिका एकमताने स्वीकारली. त्यामध्ये त्यांच्यावर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला. न्यायालयाने ७-२ बहुमताने त्यांना तात्काळ पंतप्रधानपदावरून निलंबित करण्याचे आदेश दिले. नेमके कुणाशी फोन कॉलवर बोलल्याने ही कारवाई झाली, समजून घेऊया.
वाद कसा सुरू झाला?
हा वाद १५ जून रोजी झालेल्या फोन कॉलशी संबंधित आहे. पॅटोंगटॉर्न यांनी माजी कंबोडियन पंतप्रधान हुन सेन (Hun Sen) यांच्याशी झालेल्या संभाषणादरम्यान थाई सैन्याच्या एका वरिष्ठ कमांडरवर टीका केली होती. त्यांनी हुन सेन यांना काका असे संबोधले आणि त्यापुढे झालेले संभाषण लीक झाले. या कॉलचे वर्णन सीमा वाद सोडवण्याचा राजकीय प्रयत्न म्हणून करण्यात आले होते, परंतु त्याचा उलट परिणाम झाला.
कोण आहेत हुन सेन?
हुन सेन हे कंबोडियन राजकारणातील एक मोठे नाव आहे. त्यांनी जवळजवळ चार दशके देशावर राज्य केले. १९८५ ते १९९३ आणि नंतर १९९८ ते २०२३ पर्यंत हुन सेन हे कंबोडियाचे पंतप्रधान होते. ऑगस्ट २०२३ मध्ये त्यांनी त्यांचा मुलगा हुन मानेट यांच्याकडे सत्ता सोपवली, परंतु ते अजूनही कंबोडियाच्या सत्ताधारी पक्षाचे प्रमुख आणि सिनेटचे अध्यक्ष यांसारखी महत्त्वाची पदे भूषवतात.
लष्कर, राजकीय संकटावर टिप्पणी
थायलंडमध्ये लष्कराची भूमिका खूप प्रभावशाली मानली जाते. अशा परिस्थितीत, पंतप्रधानांनी लष्करावर केलेल्या वैयक्तिक टिप्पणीला लष्कर आणि विरोधी पक्षांनी गांभीर्याने घेतले. या कॉल लीकनंतर, केवळ सार्वजनिक निषेध झाले नाहीत, तर एका मोठ्या पक्षानेही शिनावात्रा सरकारचा पाठिंबा काढून घेतला. या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर, मंगळवारी थायलंडचे राजा महा वजिरालोंगकोर्न यांनी मंत्रिमंडळातील फेरबदलाला मान्यता दिली.