Thailand News:थायलंडची राजधानी बँकॉकमधील प्रसिद्ध सफारी वर्ल्ड प्राणीसंग्रहालयात बुधवारी सकाळी एक दुःखद घटना घडली. सिंहांनी प्राणीसंग्रहालयातील एका कर्मचाऱ्यावर हल्ला करुन ठार मारले. ही संपूर्ण घटना पर्यटकांसमोर घडली.
बँकॉक पोस्टच्या वृत्तानुसार, ५८ वर्षीय जियान रंगखारासामी हे वाहनातून बाहेर पडले आणि दरवाजा उघडा ठेवला. त्यानंतर मागून एका सिंहाने त्यांच्यावर हल्ला केला आणि काही वेळातच इतर सिंहांनी झडप घातली. या दरम्यान, जवळच्या गाड्यांमध्ये बसलेले पर्यटक हे भयानक दृश्य पाहत राहिले. सिंहासमोर कोणीही त्यांना वाचवू शकले नाही. घटनेनंतर जियानला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
प्राणीसंग्रहालयाचा ड्राइव्ह-इन झोन बंद या घटनेनंतर, सफारी वर्ल्ड प्राणीसंग्रहालयाचा ड्राइव्ह-इन झोन तात्काळ बंद करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, पर्यटकांची सुरक्षितता सुनिश्चित होईपर्यंत हा भाग पुन्हा उघडला जाणार नाही. तपासात असेही आढळून आले की, सफारी वर्ल्ड प्राणीसंग्रहालयाला ४५ सिंह पाळण्याचा अधिकृत परवाना होता, त्यापैकी १३ आधीच मरण पावले आहेत. आता सर्व परवाने आणि नोंदींची तपासणी केली जाईल.
मृताच्या पत्नीने सांगितले की, जियान गेल्या २० वर्षांपासून सिंह आणि बिबट्यांची काळजी घेत होता. यापूर्वी अशी घटना कधीही घडली नव्हती. सफारी वर्ल्ड पीएलसीने या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे आणि कुटुंबाला पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, भविष्यात असा अपघात होऊ नये म्हणून सुरक्षा प्रोटोकॉलचा पुन्हा आढावा घेतला जाईल.