Thailand News: थायलंडच्यापंतप्रधान पतोंगटार्न शिनावात्रा यांना मंगळवारी देशाच्या संवैधानिक न्यायालयाने एका गंभीर प्रकरणाची चौकशी होईपर्यंत पदावरुन निलंबित केले. त्यानंतर, आता थायलंडचे मंत्री सूर्या जुंगरुंगग्रेआंगकिट काळजीवाहू पंतप्रधान म्हणून देशाचे नेतृत्व करणार आहेत. विशेष म्हणजे, त्यांचा कार्यकाळ फक्त बुधवारी संपूर्ण दिवसासाठीच असणार आहे. नेशन थायलंडच्या वृत्तानुसार, थायलंडच्या इतिहासात पहिल्यांदाच नवीन मंत्रिमंडळ शपथ घेत असताना पंतप्रधानांना निलंबित करण्यात आले आहे.
शिनावात्रा यांना पदावरुन निलंबित का केले?मे २०२५ मध्ये थायलंड व कंबोडिया दरम्यान सीमेवर तणाव निर्माण झाला होता. यात चकमकीत कंबोडियाच्या एका जवानाचा मृत्यू झाला होता. या तणावातच पंतप्रधान शिनावात्रा यांनी कंबोडियाचे नेते व माजी पंतप्रधान हून सेन यांना फोन केला होता. हा फोन कॉल लीक झाला. यात शिनावात्रा हून सेन यांना ‘अंकल’ म्हणून संबोधित केल्याचे स्पष्ट झाले. थायलंडच्या संसदेतील ३६ खासदारांच्या गटाने पंतप्रधानांविरुद्ध याचिका दाखल केली होती.
थायलंडच्या पंतप्रधान शिनावात्रा यांनी या प्रकरणात देशाची पत घालवल्याचा विरोधी खासदारांचा आरोप आहे. त्यांच्या या वागण्यामुळे थायलंडची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि लष्कराचा स्वाभिमान दुखावला गेल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. मात्र, आपण जे काही केले, ते संघर्ष आणि तणाव टाळण्यासाठी केल्याचे शिनावात्रा यांनी म्हटले. न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करुन चौकशीत सर्व प्रकारे सहकार्य करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
थायलंड-कंबोडिया वाद काय आहे?कंबोडियासोबतच्या सीमा वादावरुन शिनावात्रा यांच्यावर बरीच टीका झाली आहे. २८ मे रोजी झालेल्या गोळीबारानंतर तर तणाव आणखी वाढला. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप केले आणि स्वसंरक्षणाचा दावा केला. या तणावानंतर थायलंडने कडक सीमा निर्बंध लादले, फक्त आवश्यक वस्तूंना सीमा ओलांडण्याची परवानगी दिली. प्रत्युत्तरादाखल, कंबोडियाने थाई माध्यमांवर बंदी घातली. फळे आणि भाज्यांची आयात थांबवली, थाई वीज आणि इंटरनेट कनेक्शनवर बहिष्कार टाकला. दरम्यान, थायलंड आणि कंबोडिया 800 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीची सीमा सामायिक करतात, परंतु काही भाग अजूनही वादग्रस्त आहेत.