दहशतवाद्यांचा हल्ला; इजिप्तमध्ये ३२ ठार

By Admin | Updated: January 31, 2015 01:40 IST2015-01-31T01:40:44+5:302015-01-31T01:40:44+5:30

इजिप्तमधील उत्तर सिनाई भागात इसिस दहशतवाद्यांनी कारबॉम्बसह अनेक स्फोटांची मालिका घडवून आणली असून तोफगोळ्यांचाही मारा

Terrorists attack; 32 killed in Egypt | दहशतवाद्यांचा हल्ला; इजिप्तमध्ये ३२ ठार

दहशतवाद्यांचा हल्ला; इजिप्तमध्ये ३२ ठार

कैरो : इजिप्तमधील उत्तर सिनाई भागात इसिस दहशतवाद्यांनी कारबॉम्बसह अनेक स्फोटांची मालिका घडवून आणली असून तोफगोळ्यांचाही मारा केला, त्यात २७ सैनिकांसह ३२ जण मारले गेले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटशी संबंधित असणाऱ्या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.
अशांत असणाऱ्या उत्तर सिनाई भागात दहशतवाद्यांनी कारबॉम्बचा स्फोट घडवून आणला, तसेच रॉकेटचाही मारा केला, त्यात २७ सैनिक व एक नागरिक मरण पावला असून, ६० जण जखमी झाले आहेत. उत्तर सिनाई भागाची राजधानी अल अरिशमधील सुरक्षा संचालनालय व जवळचा लष्करी तळ, एक हॉटेल व सुरक्षा चेकनाके हे दहशतवाद्यांचे लक्ष्य होते, असे सरकारी टीव्ही व अहराम अरेबिक या वेबसाईटने म्हटले आहे. दहशतवाद्यांनी तोफगोळ्यांचा मारा केला, तसेच कारबॉम्बही घडवून आणले. तीन क्षेपणास्त्रांचाही मारा केला, असे सूत्रांनी सांगितले.
दुसऱ्या एका हल्ल्यात एक अधिकारी मारला गेला. गाझापट्टीच्या सीमेजवळील रफाह या गावातील लष्करी चेकनाक्यावर रॉकेट आदळले, त्यात हा अधिकारी मारला गेला.
हा हल्ला झाल्यानंतर इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतेह अल सिसी यांनी आपला इथियोपियाचा दौरा आवरता घेतला असून ते इजिप्तला परतत आहेत. इथियोपिया येथे आफ्रिकन युनियनची परिषद होती, त्यासाठी अल सिसी गेले होते. इराकमधील इस्लामिक स्टेटची शाखा असणाऱ्या अन्सर बैत अल मकदिस या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. इस्लामी अध्यक्ष मोहंमद मोर्सी यांची हकालपट्टी केल्यापासून इजिप्त अस्थिर असून, दहशतवाद्यांचे हल्ले चालू आहेत. मकदिस संघटनेने इसिस संघटनेशी संलग्नता जाहीर केली आहे. (वृत्तसंस्था)

 

 

Web Title: Terrorists attack; 32 killed in Egypt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.