काबूलमध्ये दहशतवादी हल्ला,स्फोटकांनी भरलेल्या ट्रकची धडक
By Admin | Updated: August 1, 2016 08:54 IST2016-08-01T08:53:02+5:302016-08-01T08:54:43+5:30
दहशतवाद्यांनी सोमवारी परदेशी नागरीकांचे वास्तव्य असलेल्या काबूलमधील नॉर्थ गेट हॉटेलला लक्ष्य केले आहे.

काबूलमध्ये दहशतवादी हल्ला,स्फोटकांनी भरलेल्या ट्रकची धडक
ऑनलाइन लोकमत
काबूल, दि. १ - दहशतवाद्यांनी सोमवारी परदेशी नागरीकांचे वास्तव्य असलेल्या काबूलमधील नॉर्थ गेट हॉटेलला लक्ष्य केले आहे. स्फोटकांनी भरलेला ट्रक हॉटेलच्या प्रवेशव्दारावर धडकल्यानंतर मोठा स्फोट झाला. सध्या इथे तालिबानी दहशतवादी आणि सुरक्षापथकांमध्ये चकमक सुरु आहे. दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळत आहे.
स्फोटामध्ये किती जिवीतहानी झाली तसेच हॉटेलचे कर्मचारी, पाहुण्यांच्या स्थितीविषयी कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. काही दिवसांपूर्वी काबूलमध्ये झालेल्या मोठया दहशतवादी हल्ल्यानंतर हा अशा प्रकारचा दुसरा हल्ला आहे. अमेरिकेच्या बागराम हवाईतळाजवळ नॉर्थगेट हॉटेल आहे. परदेशी कंत्राटदार या हॉटेलमध्ये वास्तव्य करतात.
परदेशी नागरीकांचा वावर असल्याने या ठिकाणी मोठा सुरक्षा बंदोबस्त असतो. अतिरेक्यांना हॉटेलमध्ये घुसता यावे यासाठी ट्रक बॉम्बचा वापर करुन मोठा स्फोट घडवण्यात आला. या हल्ल्यात १०० जण ठार झाल्याचा दावा तालिबानने केला आहे.
मात्र तालिबानकडून नेहमीच अशा पद्धतीचे उलट-सुलट आकडे सांगितले जातात. २३ जुलैला काबूलमध्ये झालेल्या दोन शक्तीशाली बॉम्बस्फोटात ८० जण ठार झाले होते. २००१ मध्ये अफगाणिस्तानातून तालिबानचे राज्य गेल्यानंतर झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता.