मध्यपूर्वेत सध्या अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात जबरदस्त युद्ध सुरू आहे. या भागातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, कतारमधून एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर येत आहे. कतारच्या प्रादेशिक जलक्षेत्रात रविवारी पहाटेच्या सुमारास एका हेलिकॉप्टरला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून, एक जण बेपत्ता आहे.स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसरा आणि 'एपी'च्या वृत्तानुसार, या हेलिकॉप्टरमध्ये एकूण सात प्रवासी स्वार होते. अपघाताची माहिती मिळताच कतारच्या संरक्षण मंत्रालयाने तातडीने शोध आणि बचाव मोहीम सुरू केली आहे. कतारच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर अपघात झाल्यापासून त्यांचे विशेष पथक देशाच्या सागरी हद्दीत शोध आणि बचाव कार्य करत आहेत. हे अभियान कोस्ट्स आणि बॉर्डर्स सिक्योरिटीचे जनरल डायरेक्टरेटचे समुद्री शोध आणि बचाव पथक आणि अंतर्गत सुरक्षा दलाच्या कतार आंतरराष्ट्रीय शोध आणि बचाव पथकाच्या समन्वयाने सुरू आहे.कतारच्या गृह मंत्रालयाने दिली अशी माहिती -कतारच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सातपैकी सहा जणांचे मृतदेह सापडले असून त्यांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी करण्यात आली आहे. उर्वरित एका बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासाठी कतारची विशेष पथके समुद्रात अत्यंत सखोल आणि व्यापक (Intensive Operation) शोधमोहीम राबवत आहेत. महत्वाचे म्हणजे, हा अपघात नेमका कशामुळे झाला, यासंदर्भात अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
कतारमध्ये भीषण हेलिकॉप्टर दुर्घटना; ६ जणांचा मृत्यू, एक बेपत्ता! नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 15:23 IST