गेल्या काही काळात विमान अपघाताच्या अनेक घटना समोर येत आहेत. भारतातील अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे तर अवघ्या देशाला हादरा बसला होता. आता अमेरिकेतून देखील एका विमान अपघाताची बातमी समोर आली आहे. मिनेसोटाच्या ट्विन सिटीज भागात ६ सप्टेंबर रोजी, शनिवारी दुपारी २:४५च्या सुमारास, रॉबिन्सन आर ६६ नावाचे हेलिकॉप्टर एका विमानतळाजवळ कोसळले. या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्व लोकांचा मृत्यू झाला. स्थानिक अधिकाऱ्यांनी या घटनेची पुष्टी केली आहे.
हेलिकॉप्टर एअरलेक विमानतळाच्या पश्चिमेला एका निर्जन भागात कोसळले आणि त्याला लगेच आग लागली. बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी हेलिकॉप्टर पूर्णपणे जळताना पाहिले. यात कोणताही प्रवासी वाचला नाही, असे त्यांनी सांगितले. हेलिकॉप्टरमध्ये किती लोक होते, हे अजून स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांनी सांगितले की, ज्या ठिकाणी हा अपघात झाला, तो भाग रहिवासी किंवा व्यावसायिक नसल्यामुळे इतर कोणतीही दुर्घटना घडलेली नाही. सध्या, अधिकारी अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास करत आहेत.
'रॉबिन्सन आर ६६' हेलिकॉप्टरची वैशिष्ट्ये'रॉबिन्सन आर६६' हे एक हलके आणि सिंगल-इंजिन टर्बाइन हेलिकॉप्टर आहे. ते रॉबिन्सन हेलिकॉप्टर कंपनीने तयार केले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये अत्याधुनिक ग्लास कॉकपिट आणि एव्हिओनिक्स सिस्टिम आहे, ज्यामुळे पायलटना उड्डाणादरम्यान उत्तम दृश्य आणि नेव्हिगेशन मिळते. हे हेलिकॉप्टर खास करून व्यावसायिक, खासगी उड्डाणे आणि प्रशिक्षणासाठी वापरले जाते. ते एका वेळी सुमारे ३५० मैल उड्डाण करू शकते आणि २४,५०० फुटांपर्यंतची उंची गाठू शकते.
या विमानामध्ये एक पायलट आणि चार प्रवासी बसू शकतात. त्याचे कमी वजन आणि शक्तिशाली टर्बाइन इंजिन त्याला कमी आणि मध्यम अंतराच्या प्रवासासाठी योग्य बनवते. या हेलिकॉप्टरचा वापर मुख्यतः खासगी मालक, छोटे व्यवसाय आणि प्रशिक्षण संस्था करतात.