मध्य-पूर्वेतील युद्ध आता समुद्रातही पेटले आहे. जगातील सर्वात महत्त्वाचा तेल मार्ग मानल्या जाणाऱ्या होर्मुजच्या सामुद्रधुनीवर इराणने आपली पकड घट्ट केली असून, येथून जाणाऱ्या व्यापारी जहाजांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल केली जात असल्याचा खळबळजनक आरोप होत आहे. इराणच्या या मनमानी कारभारामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे.
एका जहाजाकडून १८ कोटींची वसुली?
समोर आलेल्या माहितीनुसार, होर्मुजच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी इराण काही व्यापारी जहाजांकडून तब्बल २० लाख डॉलर्स (सुमारे १८ कोटी रुपये) इतकी प्रचंड फी मागत आहे. इराणचे खासदार अलाउद्दीन बोरुजेर्दी यांनी या निर्णयाचे समर्थन करताना म्हटले आहे की, "युद्धाच्या काळात वाढलेला खर्च पाहता हे पाऊल उचलणे आवश्यक आहे. या धोरणात्मक समुद्री मार्गावर इराणचा अधिकार असल्याने शुल्क आकारणे स्वाभाविक आहे."
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी स्पष्ट केले आहे की, हा मार्ग केवळ त्या देशांच्या जहाजांसाठी बंद किंवा महाग केला जात आहे, ज्यांना इराण आपला शत्रू मानतो.
का महत्त्वाची आहे ही सामुद्रधुनी?
होर्मुजची सामुद्रधुनी ही जगाची लाईफलाईन मानली जाते. जगातील एकूण तेल आणि लिक्विफाइड नॅचरल गॅसपैकी सुमारे २० टक्के पुरवठा याच मार्गावरून होतो. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून इराणने येथे निर्माण केलेल्या अडथळ्यांमुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत.
भारत आणि पाकिस्तानला दिलासा?
इराणने सर्वांसाठी सारखे नियम लावलेले नाहीत. भारताच्या एलपीजी जहाजांना या मार्गावरून जाण्याची परवानगी देण्यात आली आहे, तसेच एका पाकिस्तानी टँकरलाही येथून जाण्याची मुभा मिळाली आहे. यावरून इराण विशिष्ट देशांना या संकटातून सवलत देत असल्याचे दिसून येत आहे.
ट्रम्प यांचा ४८ तासांचा अल्टिमेटम
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या या कृतीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी इराणला पुढील ४८ तासांत हा जलमार्ग पूर्णपणे खुला करण्याची ताकीद दिली आहे. दुसरीकडे, इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने पलटवार करत म्हटले आहे की, जर अमेरिकेने इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ला केला, तर ही सामुद्रधुनी कायमची बंद केली जाईल.
Web Summary : Iran is tightening control over the Hormuz Strait, charging exorbitant fees from ships. This disrupts global oil supply. Trump issued a warning. India and Pakistan get some relief. Closure threatened if US attacks Iranian power plants.
Web Summary : ईरान होर्मुज जलडमरूमध्य पर नियंत्रण बढ़ा रहा है, जहाजों से भारी शुल्क वसूल रहा है। इससे वैश्विक तेल आपूर्ति बाधित हो रही है। ट्रंप ने चेतावनी जारी की। भारत और पाकिस्तान को कुछ राहत मिली। यदि अमेरिका ने ईरानी बिजली संयंत्रों पर हमला किया तो इसे बंद करने की धमकी दी।