येमेनमध्ये फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या भारतीय नर्स निमिषा प्रिया (Nimisha Priya) हिला वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न सुरू आहेत. पीडित कुटुंबियांनी 'ब्लड मनी' अर्थात आर्थिक मोबदला स्वीकारल्यास निमिषाचा जीव वाचू शकतो, अशी आशा होती. मात्र, तलालच्या कुटुंबीयांनी ही रक्कम स्वीकारण्यास नकार दिला आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. निमिषाला २०१७ साली येमेनचा नागरिक तलाल अब्दो महदी (Talal Abdo Mahdi) याच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते.
८ कोटींच्या 'ब्लड मनी'ची ऑफर नाकारली?येमेनच्या कायदेशीर व्यवस्थेनुसार, जर पीडित कुटुंब 'ब्लड मनी' स्वीकारण्यास तयार झाले, तर निमिषाला माफी मिळू शकते. 'ब्लड मनी' म्हणजे दोषी व्यक्तीकडून पीडित कुटुंबाला दिला जाणारा आर्थिक मोबदला. टेलीग्राफ इंडियाच्या वृत्तानुसार, निमिषा प्रियाच्या प्रकरणात ८ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, 'सेव्ह निमिषा प्रिया इंटरनॅशनल ॲक्शन कौन्सिल'ने (Save Nimisha Priya International Action Council) संपूर्ण रकमेसोबतच तलालच्या कुटुंबाला शिक्षण, वैद्यकीय आणि इतर अनेक प्रकारची मदत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, पीडित कुटुंबाने सर्व ऑफर नाकारल्याचे बोलले जात आहे. कौन्सिलच्या उपाध्यक्षा दीपा जोसेफ यांनी टेलीग्राफशी बोलताना सांगितले, "सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आम्ही माणुसकीच्या नात्याने शक्य ती सर्व मदत देऊ करत आहोत, पण कुटुंबाने अद्याप काहीही स्वीकारले नाही. गुरुवारपर्यंत सना येथून काहीतरी चांगली बातमी येईल अशी आम्हाला आशा आहे."
येमेनमधील संघर्षामुळे अडचणी वाढल्या!यमनमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे निमिषा प्रिया प्रकरणात अडचणी आणखी वाढल्या आहेत. सना आणि देशाच्या बहुसंख्य भागांवर हुती बंडखोरांचे (Houthi Rebels) नियंत्रण आहे, ज्यामुळे भारतीय अधिकाऱ्यांचा प्रभाव कमी झाला आहे. जोसेफ म्हणाले की , "प्रेमा कुमारी (निमिषा प्रियाची आई) गेल्या एप्रिलपासून येमेनमध्ये आहेत. त्यांना एखादा चमत्कार घडण्याची आशा वाटत आहे. प्रियाचे पती आणि १२ वर्षांची मुलगी इडुक्कीमध्ये आहेत."
केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील कोलेनगोडे येथील प्रियाला जुलै २०१७मध्ये येमेनमधील एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. तो व्यक्ती प्रियाचा व्यावसायिक भागीदार होता. यमनच्या न्यायालयाने २०२० मध्ये तिला फाशीची शिक्षा सुनावली होती आणि देशाच्या सर्वोच्च न्यायिक परिषदेने नोव्हेंबर २०२३ मध्ये तिचे अपील फेटाळून लावले. निमिषा येमेनची राजधानी सना येथील कारागृहात बंदिस्त आहे.