सिरीयातील फुटीरवाद्यांनी सॉटलॉफ यांना ISISला विकले
By Admin | Updated: September 9, 2014 19:53 IST2014-09-09T19:51:37+5:302014-09-09T19:53:36+5:30
इराकमधील आयएसआयएस या दहशतवादी संघटनेने शिरच्छेद केलेले अमेरिकी पत्रकार स्टीवन सॉटलॉफ यांना सिरीयातील फुटीरवादी गटाकडून विकत घेतले होते असा दावा सॉटलॉफ कुटुंबाने केला आहे.

सिरीयातील फुटीरवाद्यांनी सॉटलॉफ यांना ISISला विकले
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - इराकमधील आयएसआयएस या दहशतवादी संघटनेने शिरच्छेद केलेले अमेरिकी पत्रकार स्टीव्हन सॉटलॉफ यांना सिरीयातील फुटीरवादी गटाकडून विकत घेतले होते असा दावा सॉटलॉफ कुटुंबाने केला आहे. यासाठी आयएसआयएसने सुमारे २५ ते ५० हजार डॉलर्स मोजले असेही सॉटलॉफ यांच्या कुटुंबाने सांगितले.
जेम्स फॉली यांचा शिरच्छेद केल्यानंतर गेल्या आठवड्यात इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया या दहशतवादी संघटनेने अमेरिकी पत्रकार स्टीवन सॉटलॉफ यांचा शिरच्छेद केला होता. या क्रूरकृत्याचे व्हिडीओही आयएसआयएसने जाहीर केले होते. या घटनेच्या पाच दिवसांनतर सॉटलॉफ यांच्या कुटुंबाचे प्रवक्ते बॅरेक बर्फी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सॉटलॉफ यांना आयएसआयएसने सिरीयातील फुटीरवादी गटाकडून विकत घेतल्याचा दावा केला. संबंधीत भागांमधील गोपनीय सूत्रांकडून ही माहिती मिळाल्याचे बर्फी यांनी सांगितले.
टाइम व फॉरेन पॉलिसी या मासिकांसाठी काम करणारे स्टीव्हन सॉटलॉफ हे ऑगस्ट २०१३ मध्ये सिरीयातून बेपत्ता झाले होते. अमेरिकेने हवाई हल्ले थांबवले नाही तर हे हत्या सत्र सुरुच राहतील असा इशाराही इसिसने सॉटलॉफ यांच्या हत्येच्या व्हिडीओत दिला होता.