जगातील सर्वात लठ्ठ माणसावर होणार शस्त्रक्रिया
By Admin | Updated: May 8, 2017 01:26 IST2017-05-08T01:26:41+5:302017-05-08T01:26:41+5:30
जवळपास सात वर्षे पलंगावर पडून राहिल्यानंतर जगातील सर्वात लठ्ठ माणूस जुआन पेड्रो फ्रँको (३२, मेक्सिको) जीव वाचवणारी

जगातील सर्वात लठ्ठ माणसावर होणार शस्त्रक्रिया
जवळपास सात वर्षे पलंगावर पडून राहिल्यानंतर जगातील सर्वात लठ्ठ माणूस जुआन पेड्रो फ्रँको (३२, मेक्सिको) जीव वाचवणारी गॅस्ट्रिक बायपास शस्त्रक्रिया करून घ्यायची तयारी करीत आहे. एक वेळ फ्रँकोचे वजन अर्ध्या टनापेक्षाही जास्त होते. त्याने २७.५ स्टोन (एक स्टोन म्हणजे १४ पौंड) म्हणजे ३८५ किलो वजन घटवल्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. येत्या मंगळवारी त्याच्यावर शस्त्रक्रिया होईल व त्यासाठी त्याने तीन महिने खाण्यापिण्याची बंधने पाळली. त्याला अनेक सखोल चाचण्यांना (रक्त, इमेजिंग, हृदय कसे काम करते आणि पल्मनोरी) तोंड द्यावे लागेल. तज्ज्ञ डॉक्टर्स या चाचण्या करतील. या शस्त्रक्रियेमुळे जुआन चालायला लागेल, अशी डॉक्टरांना आशा आहे. डॉ. जोस अँटोनिओ कॅस्टानेदा क्रूझ म्हणाले की, ‘अगदी सुरुवातीला त्याचे जे वजन होते त्यातील जवळपास ३० टक्के घटले आहे. त्यामुळे त्याच्यावर बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया केली जाऊ शकते.’ गेल्या नोव्हेंबर महिन्यात जुआनला असे लक्षात आले की, डॉक्टर आपले जे वजन समजत होते त्यापेक्षा ते १५ स्टोन जास्त आहे. नोव्हेंबर महिन्यात शस्त्रक्रियेसाठी जुआनला रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यावेळी त्याचे वजन जवळपास ७९ स्टोन (१,१०६ पौंड) होते; परंतु चाचण्यांत त्याचे खरेखुरे वजन ९२ स्टोन (१,२८८ पौंड) होते. मे २०१४ मध्ये मॅन्युएल उरिबे याचे वजन विक्रमी ९४ स्टोन (१,३१६ पौंड) होते. मेक्सिकोतील जवळपास ७५ टक्के प्रौढ हे अति वजनाचे किंवा स्थूल समजले जातात.