कतार देशातील दोहा येथे नुकतेच इस्रायलने हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर इस्लामिक देशांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. आज कतारची राजधानी दोहा येथे ५० हून अधिक मुस्लीम देश एकत्र आले आहेत. याच दोहा येथे हल्ला करून इस्रायलने हमासचे काही सीनिअर कमांडर मारल्याचा दावा केला होता. या हल्ल्यानंतर इस्लामिक देशांनी इस्रायलने रेड लाइन ओलांडल्याचं बोलले आहे. त्यामुळेच मुस्लीम देशाच्या शिखर संमेलनाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या संमेलनातून इस्लामिक देश अमेरिकेवरही दबाव वाढवून इस्रायलवर नियंत्रण ठेवा, अन्यथा गोष्टी बिघडू शकतात असा संदेश देत आहेत.
माहितीनुसार, इस्रायलच्या हल्ल्याने तुर्कीलाही दहशतीच्या सावटाखाली आणले आहे. इस्रायल सैन्याचे प्रमुख जनरल एयाल जामिर यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं की, गाझाच्या बाहेर दुसऱ्या देशातून हमाल नेतृत्व काम करत आहे. आम्ही त्यांनाही टार्गेट करत आहोत. त्यातूनच कतारची राजधानी दोहा येथे हल्ला करण्यात आला. दोहा तीच जागा आहे जिथे हमाससोबत शांततेसाठी चर्चेचे आयोजन केले होते. त्यामुळेच दोहाला इस्रायलने सोडले नाही तर तुर्कीलाही त्यांच्यावर हल्ला होण्याची भीती सतावत आहे. कारण तुर्कीमध्येही हमासच्या नेतृत्वाला शरण मिळते.
तुर्कीकडून हमासला शरण, पैसा, वैचारिक पाठिंबा आणि इतर गोष्टी मिळतात असा इस्रायलचा दीर्घ काळापासून आरोप आहे. त्यामुळेच इस्रायलकडून तुर्कीवर हल्ला होण्याची चिंता लागून आहे. भविष्यात इस्रायलने आणखी धाडस करू नये यासाठीच इस्लामिक समिट बोलवण्यात आले आहे. यात पाकिस्तान, सौदी, तुर्कीसह देशातील ५० इस्लामिक देश सहभागी होणार आहेत. मागील २ वर्षात इस्रायलने यमन, लेबनान, इराण, सीरिया, पॅलेस्टाईन आणि कतार या देशांवर हल्ला केला आहे. त्यामुळे तुर्कीलाही इस्रायल हल्ल्याचा धोका सतावत आहे.
दरम्यान, कतारवर हल्ला होणे खूप महत्त्वाचे समजले जाते, कारण त्यातून इस्रायलचे हे धाडसी पाऊल सगळ्यांना दिसून आले. कतारमध्ये अमेरिकेचा बेस आहे. तो अमेरिकेचा सहकारी देश आहे. तरीही इस्रायलने त्यांच्यावर हल्ला करणे आणि कुठलीही किंमत मोजण्याची तयारी ठेवणे यातूनच तुर्कीची चिंता वाढली. अमेरिकेचा सहकारी असूनही कतारवर हल्ला होऊ शकतो, तर आपल्यावरही इस्रायल हल्ला करायला मागे पुढे पाहणार नाही असं तुर्कीच्या नेतृत्वाला वाटते. विशेष म्हणजे पाकिस्तान आणि भारत यांच्या संघर्षात तुर्कीने उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. त्याने अनेक ड्रोन पाकच्या मदतीला पाठवले, ज्यातून पाकिस्तान भारतावर हल्ले करत होता. परंतु पाकचे सगळे हल्ले भारताने यशस्वीरित्या परतावून लावले.