पाकमध्ये स्टेडियमजवळ आत्मघाती स्फोट
By Admin | Updated: May 30, 2015 23:46 IST2015-05-30T23:46:05+5:302015-05-30T23:46:05+5:30
पाकिस्तान-झिम्बाब्वे संघात गद्दाफी स्टेडियमवर शुक्रवारी क्रिकेट सामना सुरू असताना जवळच झालेल्या आत्मघाती स्फोटात अतिरेकी व पोलीस निरीक्षक ठार, तर अन्य १० जण जखमी झाले.

पाकमध्ये स्टेडियमजवळ आत्मघाती स्फोट
लाहोर : पाकिस्तान-झिम्बाब्वे संघात गद्दाफी स्टेडियमवर शुक्रवारी क्रिकेट सामना सुरू असताना जवळच झालेल्या आत्मघाती स्फोटात अतिरेकी व पोलीस निरीक्षक ठार, तर अन्य १० जण जखमी झाले. दिवस-रात्र असा हा सामना सुरू असताना स्टेडियमवर यावेळी सुमारे २० हजार प्रेक्षक उपस्थित होते. शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास आत्मघात करून घेणाऱ्याला पोलीस निरीक्षकाने अडवताच त्याने स्वत:ला उडवून घेतले.
२००९ मध्ये याच स्टेडियमनजीक श्रीलंकेच्या क्रिकेट संघावर तालिबान्यांनी हल्ला केला होता. त्यात ६ खेळाडू जखमी झाले होते. त्यानंतर पहिल्यांदाच विदेशी क्रिकेट संघ पाकिस्तानात आला आहे. या स्फोटानंतर झिम्बाब्वे संघाच्या सुरक्षेबद्दल काळजी व्यक्त होत आहे. हल्लेखोर रिक्षातून आला होता व स्टेडियमपासून साधारणत: एक किलोमीटरवर त्याला कलमा चौकात पोलीस निरीक्षक अब्दुल माजीद याने अडविताच त्याने स्वत:ला उडवून घेतले.
स्फोटानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात तो स्फोट पॉवर ट्रान्स्फॉर्मरचा होता व ऐनवेळी ट्रान्स्फॉर्मर बिघडून त्याचा स्फोट झाला असा दावा केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने तो आत्मघाती स्फोट असल्याचे फेटाळून लावले आहे. त्या रिक्षामध्ये गॅस सिलिंडर बसविण्यात आले होते व त्याचाच स्फोट झाला. स्फोटाचे स्वरूप निश्चित करून घेण्यासाठी स्फोटाच्या ठिकाणाहून नमुने गोळा करण्यात आले आहेत. तो स्फोट आत्मघाती होता असे आताच म्हणणे योग्य ठरणार नाही, असेही हा अधिकारी म्हणाला. (वृत्तसंस्था) (आणखी वृत्त क्रीडा पानावर)
४गद्दाफी स्टेडियमवर हल्ल्याचा प्रयत्न धाडसी पोलीस निरीक्षकाने उधळून लावला व त्यात तो ठार झाला, असे माहितीमंत्री परवेझ रशीद यांनी ‘जिओ न्यूज’ला सांगितले.
४पंजाब सरकारने झिम्बाब्वे संघाला त्याच्या पाकिस्तान दौऱ्यात पाकिस्तानच्या अध्यक्षांना असते ते संरक्षण दिले आहे.
४झिम्बाब्वेचा क्रिकेट संघ नियोजनानुसार शेवटचा एकदिवसीय सामना रविवारी खेळेल, असे मंडळाचे प्रवक्ते आगा अकबर यांनी सांगितले.