Donald Trump On India: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताची चिंता वाढवणारी भूमिका घेतली आहे. भारतासह इतर देशांमध्ये नोकर भरती करून नका, असा कठोर संदेश ट्रम्प यांनी गुगल, मायक्रोसॉफ्टसह इतर टेक कंपन्यांना दिला आहे. वॉशिंग्टन मध्ये आयोजित एका AI शिखर परिषदेत ते बोलत होते. ट्रम्प यांनी अमेरिकेतील कंपन्यांना अमेरिकेतील लोकांनाच नोकरीवर घेण्याचा सल्ला दिला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एआय समिट वेळी भारतीयांना आणि इतर परदेशातील नागरिकांना नोकरी देण्याचा मुद्दा उपस्थित केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील तंत्रज्ञानाधारित कंपन्यांमध्ये परदेशी व्यक्तींना घेण्यावरून टीका केली.
परदेशी नागरिकांना कंपन्यांमध्ये घेतले जात असून, त्यामुळे अमेरिकेतील गुणवत्तेकडे दुर्लक्ष केले जात असल्याची भावना निर्माण झाली आहे, असे ट्रम्प म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प टेक कंपन्यांवर का संतापले?
"चीनमध्ये फॅक्टरी सुरू करण्यापेक्षा आणि भारतातील अभियंत्यांना नोकऱ्या देण्यापेक्षा अमेरिकन कंपन्यांनी आता मायदेशात रोजगार निर्मितीवर लक्ष द्यायला हवे", असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
"काही अमेरिकन कंपन्या स्वातंत्र्याचा फायदा घेऊन भरपूर नफा मिळवत आहेत आणि दुसऱ्या देशात जाऊन गुंतवणूक करत आहेत. आता राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा काळ आहे, आता ते दिवस संपले आहेत", असा धमकीवजा इशाराच ट्रम्प यांनी गुगल, मायक्रोसॉफ्टसह इतर टेक कंपन्यांना दिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट चीन आणि भारताचा उल्लेख केला आहे. भारतीय अभियंत्यांना नोकऱ्या देण्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी भारतीयांना नोकरी देण्याबद्दल जाहीरपणे विरोध केला आहे. त्यामुळे अमेरिकेतील गुणवत्ता डावलली जात असल्याचे सांगत त्यांनी टेक कंपन्यांवर निशाणा साधला आहे.
जगातील अनेक मोठंमोठ्या कंपन्यांची सूत्रे भारतीयांच्या, भारतीय वंशांच्या व्यक्तीच्या हातात आहे. याच अनुषंगाने ट्रम्प यांनी हे विधान केले आहे.