चोरलेल्या आय फोनवरील सेल्फी पडली महागात
By Admin | Updated: March 29, 2015 14:34 IST2015-03-29T14:26:40+5:302015-03-29T14:34:19+5:30
अमेरिकेत एका क्लबमधून आय फोन चोरणा-या १७ वर्षाच्या तरुणीने आय फोनवर सेल्फी काढली पण ते सर्व फोटो आय फोन मालकाच्या फेसबुकवर अपलोड झाले व आय फोन चोरणा-या तरुणीचा चेहरा जगजाहीर झाला.

चोरलेल्या आय फोनवरील सेल्फी पडली महागात
>ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. २९ - सेल्फी काढण्याचा ट्रेंड सध्या जोमात असून सेल्फी काढण्याच्या मोहापायी आय फोन चोरणा-या तरुणीचे बिंग फुटले. अमेरिकेत एका क्लबमधून आय फोन चोरणा-या १७ वर्षाच्या तरुणीने आय फोनवर सेल्फी काढली पण ते सर्व फोटो आय फोन मालकाच्या फेसबुकवर अपलोड झाले व आय फोन चोरणा-या तरुणीचा चेहरा जगजाहीर झाला. अखेरीस तरुणीच्या आईने हा फोन मुळ मालकाकडे परत केला असून मुलीवर कायदेशीर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.
अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे राहणा-या रॉली बिंगहॅम या २३ वर्षीय तरुणीचा महागडा आयफोन तीन दिवसांपूर्वी चोरीला गेला होता. रॉली न्यूयॉर्कमधील क्लबमध्ये गेली असता तिथे एका तरुणीने तिला बोलण्यात गुंतवून रॉलीच्या पर्समधील आय फोन लंपास केला. रॉलीला हा सर्व प्रकार समजण्यापूर्वी आय फोन व मोबाईल चोर तरुणी क्लबमधून पसार झाली होती. आता आय फोन कधीच परत मिळणार नाही असे तिला वाटत होते. पण घटनेच्या तीन दिवसांनी लॉरीने फेसबुकवर लॉग इन केले व तिला आश्चर्याचा धक्का बसला. तिच्या फेसबुक अकाऊंटवर चोरीला गेलेल्या आयफोनवरुन काढलेले १६ फोटो अपलोड झाले होते. विशेष म्हणजे हे सर्व फोटो म्हणजे मोबाईल चोरणा-या तरुणीने काढलेली सेल्फी होती. तिने या घटनेची माहिती पोलिसांनी दिली व पोलिसांनी मोबाईल चोर तरुणीचा फोटो सर्व पोलिस ठाण्यांमध्ये पाठवून दिला. मोबाईल चोर तरुणीच्या आईला हा प्रकार समजल्यावर तिने तो फोन स्थानिक पोलिसांना आणून दिला. मोबाईल चोरणारी तरुणी अल्पवयीन असल्याने तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रीया सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.