विशेष लेख: ‘प्लेबॉय’च्या मुखपृष्ठावर महिला मंत्र्यांचा फोटो! फ्रान्समध्ये झाला राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2023 08:25 IST2023-04-08T08:18:48+5:302023-04-08T08:25:39+5:30
‘प्लेबॉय’ हे मासिक विशेषत: महिलांच्या नग्न, अर्धनग्न, बोल्ड आणि कलात्मक फोटोंसंदर्भात संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे.

विशेष लेख: ‘प्लेबॉय’च्या मुखपृष्ठावर महिला मंत्र्यांचा फोटो! फ्रान्समध्ये झाला राडा
‘प्लेबॉय’ हे मासिक विशेषत: महिलांच्या नग्न, अर्धनग्न, बोल्ड आणि कलात्मक फोटोंसंदर्भात संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. या मासिकात लेख, कथा वगैरे इतर मजकूरही प्रसिद्ध होत असला तरी हे मासिक जगभरात नावाजलं जातं, ते फोटोंसंदर्भातच. विशेषत: पुरुष वाचक आणि ‘दर्शकां’चा वाटा यात खूप मोठा आहे.
जगातल्या अनेक प्रसिद्ध, नामांकित अभिनेत्रीही या मासिकाच्या मुखपृष्ठावर आपला फोटो छापून यावा यासाठी धडपडत असतात. कारण या मासिकाच्या मुखपृष्ठावर फोटो म्हणजे जगभरात हमखास प्रसिद्धीची खात्री. अर्थात याबाबतीत मासिकाचे नियमही बरेच कडक आहेत असं सांगितलं जातं. ते असो. पण, सध्या एका वेगळ्याच कारणानं हे मासिक आणि फ्रान्सच्या सोशल इकॉनॉमी तसेच जेंडर इक्वॅलिटी मंत्री मर्लिन शिअप्पा (French Minister Marlene Schiappa) प्रकाशझोतात आल्या आहेत.
‘प्लेबॉय’ मासिकाच्या मुखपृष्ठावर नुकताच फ्रान्सच्या ४० वर्षीय मंत्री मर्लिन यांचा उत्तान फोटो छापून आला आहे. याशिवाय गे समाज आणि महिला अधिकारांविषयी १२ पानांचा त्यांचा एक लेखही मासिकात प्रसिद्ध झाला आहे. मर्लिन यांच्या फोटोवरून संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या विषयावर तिथे जणू काही ‘राडा’च सुरू आहे. देशाच्या जबाबदार महिला मंत्र्याचाच अशा तऱ्हेचा फोटो मासिकाच्या मुखपृष्ठावर छापून आल्यानं अनेकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. खुद्द त्यांच्या पक्षानं आणि फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बॉर्न आणि इतर मंत्र्यांनीही त्यांना यावरून धारेवर धरलं आहे.
फ्रान्स सध्या एका विलक्षण अशा संकटकाळातून जात आहे. बेरोजगारीनं लोक त्रस्त झाले आहेत. नोकरीसाठी त्यांना टाचा घासाव्या लागत आहेत. महागाईनं कळस गाठला आहे. भुकेनं लोकांचा जीव जातो आहे. निवृत्तीचं वाढवलेलं वय आणि नव्या पेन्शनला विरोध करण्यासाठी लक्षावधी लोक रस्त्यावर उतरले आहेत. अशावेळी मंत्र्यांना हे कसले चाळे सुचताहेत, देशाची आणि सर्वसामान्य जनतेची मान त्यांनी शरमेनं खाली झुकवली आहे, अशा शब्दांत अनेकांनी त्यांच्यावर टीकेचा भडिमार केला आहे. अर्थातच मर्लिन यांच्या कृतीचं समर्थन करणारेही अनेक लोक आहेत. जग कुठे चाललंय आणि कोणत्या गोष्टींचा आपण इश्यू करतोय, नको त्या आणि कोणाच्याही खासगी गोष्टींत कोणीही नाक खुपसू नये, त्यांच्या कामाबद्दल बोला, असा इशाराही मर्लिन समर्थकांनी टीकाकारांना दिला आहे.
खुद्द मर्लिन यांनी टीकाकारांना खडे बोल सुनावताना म्हटलं आहे, महिलांच्या शरीर-मनावर फक्त त्यांचाच अधिकार आहे. आपल्या शरीराबाबत काय करायचं, हे ठरवण्याचा अधिकार त्यांचाच आहे आणि त्याबाबत त्या स्वतंत्र आहेत. प्लेबॉय मासिकाच्या मुखपृष्ठावर माझा फोटो छापून आल्यानं ज्यांना त्रास होतोय, ते मागासलेल्या विचारसरणीचे आहेत. या फोटोमुळे त्यांची अडचण होत असेल, तर होऊ द्या. त्याबाबत मी काहीही करू शकत नाही. कारण अशा लोकांना कायमच हे दुखणं राहील आणि ती त्यांची कायमचीच अडचण असेल.
फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डरमानिन हेदेखील मर्लिन यांच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत. ‘मर्लिन या अतिशय चारित्र्यवान आणि धाडसी महिला राजकारणी आहेत. त्यांच्या कामाची पद्धत अतिशय वेगळी आहे. त्यांच्याविषयी आणि त्यांच्या कामाविषयी मला अतिशय आदर आहे,’ असं म्हणत त्यांना जाहीर समर्थन दिलं आहे.
दुसऱ्या बाजूला प्लेबॉय मासिकही या वादात उतरलं असून, त्यांनी मर्लिन यांचं समर्थन करताना फ्रान्स सरकार आणि त्यांच्या इतर मंत्र्यांनाही डिवचलं आहे. प्लेबॉय मासिकाचं म्हणणं आहे, आमच्या मासिकाच्या मुखपृष्ठावर फोटो छापून येण्यासाठी फ्रान्सच्या कोणत्याही मंत्र्यांपेक्षा मर्लिन याच सर्वाधिक योग्य आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून महिला अधिकारांच्या क्षेत्रात त्यांनी केलेलं, करीत असलेलं काम अतुलनीय आहे. प्लेबॉय मासिक कुठल्याही अर्थानं ‘सॉफ्ट पॉर्न’ नाही. महिलांच्या अधिकारांचा आवाज बनण्याची ताकद आणि क्षमता या मासिकात आहे.