दक्षिण कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी सकाळी १७५ प्रवासी आणि सहा क्रू सदस्य असलेलं जेजू एअरचं विमान धावपट्टीवरून घसरलं आणि एका काँक्रीटच्या भिंतीवर जोरदार आपटलं. या धडकेमुळे विमानाला आग लागली आणि विमानात मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेतील दोन जण जिवंत राहिले आहेत. १७९ जणांचा मृत्यू झाला आहे.
जेजू विमान अपघातानंतर प्रवाशांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. कोरियन मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका प्रवाशाच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, अपघाताच्या काही मिनिटांपूर्वी त्यांना विमानात बसलेल्या व्यक्तीकडून एक मेसेज आला होता. विमानाला पक्षी आदळल्याचं त्या व्यक्तीने म्हटलं होतं. तसेच दुसऱ्या मेसेजमध्ये "मी माझे शेवटचे शब्द बोलू का?" असं म्हटलं.
जेजू एअर ही कमी खर्चात प्रवास देणाऱ्या सर्वात मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक आहे. या कारणास्तव ही सर्वसामान्यांची पहिली पसंती आहे. या विमानाच्या इतिहासातील हा पहिलाच मोठा अपघात आहे. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितलं की, दोन जण जिवंत सापडले असून त्यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आलं आहे.
दक्षिण कोरियाची न्यूज एजन्सी योनहापने दिलेल्या माहितीनुसार, विमानातील १७३ प्रवासी दक्षिण कोरियाचे होते आणि दोन प्रवासी थायलंडचे होते. विमान अपघातामागे कोणतेही ठोस कारण सापडलेलं नाही. मात्र योनहापने दिलेल्या माहितीनुसार, अपघाताचे कारण विमान पक्ष्यांना आदळल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियावरील काही व्हिडिओंमध्ये असा दावा केला जात आहे की, विमान लँड होण्यापूर्वी त्याचे लँडिंग गियर पूर्णपणे उघडले गेले नव्हते आणि हे देखील अपघाताचे संभाव्य कारण असू शकतं.