कवटीवरील त्वचेचे पहिल्यांदाच प्रत्यारोपण
By Admin | Updated: June 6, 2015 00:18 IST2015-06-06T00:18:30+5:302015-06-06T00:18:30+5:30
मेंदूचा सुरक्षितपणे सांभाळ करणाऱ्या कवटीवरील त्वचेचे प्रत्यारोपण करण्याची किमया अमेरिकेतील डॉक्टरांनी साधल्याने प्रत्यारोपणाच्या बाबतीत वैद्यकीय क्रांती सिद्ध झाली आहे.

कवटीवरील त्वचेचे पहिल्यांदाच प्रत्यारोपण
ह्यूस्टन : मेंदूचा सुरक्षितपणे सांभाळ करणाऱ्या कवटीवरील त्वचेचे प्रत्यारोपण करण्याची किमया अमेरिकेतील डॉक्टरांनी साधल्याने प्रत्यारोपणाच्या बाबतीत वैद्यकीय क्रांती सिद्ध झाली आहे. अशाप्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया असून हे तंत्र उभ्या जगासाठी वरदान ठरणार आहे. कर्करोग झालेल्या ५५ वर्षाच्या माणसाला डोक्याला मोठी जखम झाल्याने त्याच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. ती तब्बल १५ तास चालली.
ह्यूस्टनच्या मेथॉडिस्ट इस्पितळातील एम डी अँडरसन कर्करोग केंद्रातील डॉक्टरांनी २२ मे रोजी झालेल्या या यशस्वी शस्त्रक्रियेची माहिती गुरुवारी जाहीर केली. जेम्स बॉयसन असे रुग्णाचे नाव असून, तो सॉफ्टवेअर क्षेत्रात आॅस्टिन येथे कार्यरत आहे. याच इस्पितळात त्याच्यावर मूत्रपिंड व स्वादुपिंड यांचे तसेच क्रेनोफेशियल टिश्यूचे प्रत्यारोपण करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर बॉयसनचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला असून, त्यात कानापासून २.५ से मी. अंतरावर डोक्यावर टाके घातलेले दिसत आहेत. कवटी व केस येणारी त्वचा एकमेकाला जोडण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया अत्यंत किचकट असल्याचे प्लास्टिक सर्जरी करणाऱ्या पथकाचे प्रमुख डॉ. मायकेल क्लीबक यांनी सांगितले.
मूलत: कवटीत नसलेली हाडे डोक्याच्या त्वचेवर बसविलेली आहेत, तसेच डोक्याच्या रक्तवाहिन्याही योग्य प्रकारे जोडण्यात आल्या आहेत असे क्लीबक यांनी सांगितले. बॉयसन शस्त्रक्रियेनंतर बरा झालेला दिसत असून, डोक्याचे स्पंदनही चालू आहे.
बॉयसन याला डोक्याची कवटी व त्वचा यावर वेगवेगळे कर्करोग होते. त्यावर शस्त्रक्रिया करताना त्याला मोठी जखम झाली होती. १९९२ साली मधुमेहातून वाचविण्यासाठी त्याच्या शरीरात मूत्रपिंड व स्वादुपिंड यांचे प्रत्यारोपण झाले.
पाच वर्षाचा असल्यापासून हे अवयव निकामी होऊ नयेत म्हणून तो औषधे घेत आहे. प्रतिकार क्षमता नियंत्रणात ठेवण्याची औषधे अवाजवी प्रमाणात द्यावी लागल्यास कर्करोग होण्याचा धोका असतो. तसाच दुर्मीळ कर्करोग झाल्यावर घेतलेल्या किरणोत्साराच्या उपचाराने त्याच्या डोक्याचा काही भाग नष्ट झाला
होता. या शस्त्रक्रियेने मला नवजीवन दिले, असे बॉयसनने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
४एकाचवेळी तीन अवयवांचे प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया प्रथमच करण्यात आली असून कवटीवर त्वचेचे प्रत्यारोपण करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
- डॉ. मायकेल क्लीबक