झिया यांच्या कार्यालयास वेढा
By Admin | Updated: January 5, 2015 03:55 IST2015-01-05T03:34:25+5:302015-01-05T03:55:40+5:30
बांगलादेशात विरोधकांनी बहिष्कार घातलेल्या गतवर्षीच्या वादग्रस्त निवडणुकीचा पहिला वर्धापन दिन सोमवारी साजरा होत

झिया यांच्या कार्यालयास वेढा
ढाका : बांगलादेशात विरोधकांनी बहिष्कार घातलेल्या गतवर्षीच्या वादग्रस्त निवडणुकीचा पहिला वर्धापन दिन सोमवारी साजरा होत असून पोलिसांनी विरोधी पक्ष नेत्या बेगम झिया यांच्या कार्यालयाला वेढा घातला आहे, त्यांच्या निषेध मोर्चांनाही बंदी घातली आहे. अवामी लीग या सत्ताधारी पक्षाच्या नेत्या व पंतप्रधान शेख हसीना यांनी या वर्धापन दिनानमित्त सोहळ्याचे आयोजन केले आहे.
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी या विरोधी पक्षाच्या प्रमुख असणाऱ्या बेगम खलिदा झिया यांनी गेल्या निवडणुकीला फार्स म्हणत त्यावर बहिष्कार टाकला होता. शनिवारपासून त्यांना गुलशन आॅफिस या त्यांच्या कार्यालयात बंदी करण्यात आले. या इमारतीभोवती पोलिसांचा वेढा असून, त्यात महिला पोलीसही आहेत.
झिया यांना पोलिसांनी कार्यालयाबाहेर पडण्यास बंदी घातली असून, त्यांच्या इच्छेविरोधात त्यांना कार्यालयात बंदी केले आहे, असे झिया (६९) यांच्या विशेष सहायक शिमुल बिस्वास यांनी पत्रकारांना सांगितले. पण पोलिस प्रवक्ता मोनीरुल इस्लाम यांनी हे वृत्त फेटाळले असून झिया यांना कोणत्याही प्रकारे बंद केलेले नाही, त्यांची सुरक्षा वाढविली आहे एवढेच असे म्हटले आहे. शनिवारी रात्रीही त्या घरी जाऊ शकल्या असत्या असे त्यानी सांगितले.
पंतप्रधान शेख हसीना यांनी निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा आरोप झिया यांनी केला होता. सोमवारी लोकशाही सरकारचा पहिला वर्धापन दिन असल्याने त्यादिवशी लोकशाहीची हत्या झालेला दिवस पाळण्याची घोषणा झिया यांनी केली होती.त्यासाठी देशभर मोर्चे व सभा आयोजित केल्या होत्या . पोलिसांनी आज राजधानी ढाका शहरात सर्व सभा व मोर्चावर बंदी घातली आहे, कायदा व सुरक्षा राखण्यासाठी रविवारी सायंकाळी ५ वाजेपासून पुढील आदेश येईपर्यंंत ही बंदी आहे. पण सत्ताधारी अवामी लीग पक्षातर्फे वर्धापनदिनानिमित्त सभा आयोजित करण्यात आली आहे.
झिया यांच्या कार्यालयाबाहेर वाळू भरलेले ट्रक रस्त्यावर उभे करण्यात आले असून, या इमारतीबाहेर कोणीही पडू नये, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. झिया पत्रकारांसमोर आल्या नाहीत; पण कार्यालयात अनेक महिला नेत्या आहेत. (वृत्तसंस्था)