पाकिस्तानच्या वरिष्ठ नेत्यांना ओसामाचा ठावठिकाणा माहित होता - पाकचे माजी संरक्षण मंत्री
By Admin | Updated: October 14, 2015 18:01 IST2015-10-14T17:58:56+5:302015-10-14T18:01:29+5:30
अमेरिकेच्या जवानांनी अबोटाबादमध्ये घुसून ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्यापूर्वीच पाकिस्तानमधील वरिष्ठ नेत्यांना त्याचा ठावठिकाणा माहिती होता, असा गौप्यस्फोट चौधरी अहमद मुख्तार यांनी केला.

पाकिस्तानच्या वरिष्ठ नेत्यांना ओसामाचा ठावठिकाणा माहित होता - पाकचे माजी संरक्षण मंत्री
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - अमेरिकेच्या जवानांनी अबोटाबादमध्ये घुसून अल-कायदाचा प्रमुख, कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्यापूर्वीच पाकिस्तानमधील वरिष्ठ नेत्यांना लादेनच्या ठावठिकाण्याबद्दल कल्पना होती, असा गौप्यस्फोट तत्कालीन संरक्षण मंत्री चौधरी अहमद मुख्तार यांनी केला आहे.
२०११ सालच्या मे महिन्यात अमेरिकेने लादेनला संपवल्यानंतर पाकिस्तानने आपल्याला लादेनबद्दल काहीही माहित नसल्याचा कांगावा केला होता. मात्र ओसामा बिन लादेन हा अबोटाबादमध्येच लपला याची माहिती पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आणि गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या अधिका-यांना होती, असे मुख्तार यांनी स्पष्ट केले.
२००८ ते २०१२ या कालावधीत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री असलेल्या मुख्तार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी तसेच जनरल कयानी यांनाही ओसामाच्या ठावठिकाण्याची माहिती होती असे त्यांनी सांगितले.
ओसामा कुठे होता, याबद्दल आपल्याला काहीच कल्पना नव्हती असा दावा वारंवार करणा-या पाकिस्तानचे पितळ त्यांच्याच संरक्षण मंत्र्यांच्या खुलाशामुळे उघडे पडले आहे.