एका असा व्यक्ती जो वाघांसोबत कायम खेळत असायचा, घरातील एका पाळीव प्राण्याप्रमाणे तो वाघाशी वागायचा. त्यांना प्रेम करायचा, खायला द्यायचा...त्या व्यक्तीच्या प्रेमाने वाघही स्वत:चं अस्तित्व विसरून गेले. त्या व्यक्तीला जास्तीत जास्त वेळ वाघांसोबत घालवायला आवडायचे परंतु या नात्याचा दुर्दैवी अंत समोर आला आहे. ज्या वाघांसोबत तो दिवस रात्र घालवायचा त्यातीलच एकाने त्याला आपलं शिकार बनवले.
अमेरिकेच्या ओकाहोमा ग्रोलर पाइन्स टायगर प्रिझर्व्हमध्ये रेयान इज्ली अनेक वर्ष वाघांसह जंगली जनावरांना प्रशिक्षण देत होते. टायगर किंग नावाने प्रसिद्ध आणि कायम वादात असलेला रेयान इज्ली वाघांची देखभाल करत होता. परंतु शनिवारी रेयानचा जीव यातील एका वाघाने घेतला ज्याच्यावर त्याने इतका जीव लावला होता. वाघाच्या हल्ल्यात रेयानचा जीव घेतल्याची घटना घडली आहे.
जंगली प्राण्यांसोबत होतं अनोखे नाते
रेयानच्या देखभालीमुळे जंगली प्राणीही पाळीव प्राण्यांसारखे वागू लागायचे. या राखीव क्षेत्रातील अर्धा डझन वाघांची काळजी घेण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. पर्यटकांसमोर तो कायम वाघांसोबत खेळताना नजरेस यायचा. जंगली प्राण्यांनाही प्रशिक्षित केले जाऊ शकते हे तो लोकांना दाखवून द्यायचा. प्रिझर्व्हने एक निवेदन जारी करत म्हटलंय की, "ही दुर्घटना नैसर्गिक जगाच्या सौंदर्याची आणि अनिश्चिततेची वेदनादायक आठवण करून देते. रेयानला त्याच्या कामातील धोका माहिती होता. त्याचे आयुष्य निष्काळजीपणामुळे नाही तर प्रेमामुळे गेले" या घटनेनंतर हे केंद्र तात्पुरते बंद करण्यात आले आहे.
वाघांनी घेतला बदला?
या घटनेची दुसरी बाजूही समोर आली आहे. पेटाने रेयानवर आरोप करत या जंगली प्राण्यांवर त्याने अत्याचार केल्याचा आरोप केला. रेयान याआधी Joe Exotic सोबत काम करायचा. त्यावेळीही तो वाघांना ट्रेनिंग देताना त्यांच्यावर अत्याचार करत होता. या वाघांना वेळोवेळी तो सर्कशीत घेऊन जायचा. २०१७ साली एका वाघाला ३१ वेळा मारल्याचे प्रकरण चर्चेत आले. तो कायम वाघांना कित्येक तास पिंजऱ्यात बंद ठेवायचा. जंगली जनावारांजवळ माणसाने जाणे कधीही सुरक्षित नसायचे. या प्राण्यांचा वापर मनोरंजनासाठी होत नाही असं पेटाने म्हटलं.
कसा गेला जीव?
टायगर प्रिझर्व्हच्या निवेदनानुसार, अखेर वाघाने रेयानवर हल्ला का केला हे अद्याप समोर येऊ शकले नाही परंतु कदाचित वाघ तणावात असेल आणि त्यातूनच त्याने रेयानवर हल्ला केला असावा असं त्यांनी म्हटलं.